कल्याण : २७ गावांतील कोळे येथील तीन बेकायदा इमारतींवर एमएमआरडीएने गुरूवारी कारवाई केली. पण कारवाई करताना त्यांनी भलत्याच व्यक्तीला नोटीस बजावली. त्या व्यक्तीने हरकत घेतल्यावर त्याचे म्हणणे ऐकून न घेता कारवाई झाल्याने तो वादाचा विषय बनला होता. कोळेगाव गावातील तळ मजला अधिक चार मजल्यांच्या तीन इमारती आणि अन्य तीन इमारती एमएमआरडीएने पाडल्या. या कारवाईची नोटीस विवेक व मनोहर पाटील यांना दिली होती. तिला विवेक यांचे पुतणे विक्रम यांनी हरकत घेतली. त्यांनी या इमारती उभारल्या नव्हता. ते बिल्डरही नाहीत. तसेच शेतकरीही नाही. या इमारती महेश पाहणे नामक बिल्डरने उभारल्या होत्या. तसेच जागेचा सातबारा राघो पाटील यांच्या नावे आहे. पण पाहणे व राघो पाटील यांना कारवाईची नोटीस बजावण्याऐवजी एमएमआरडीएने भलत्याच व्यक्तीला नोटीस बजावली. याबबात विक्रम यांनी विचारणा केल्यावर त्यांचे म्हणणे एमएमआरडीएच्या कारवाई पथकाने ऐकून घेतले नाही. हा प्रकार २७ गाव संघर्ष समितीला कळताच त्यांचे पदाधिकारी कारवाई थांबविण्यासाठी तेथे पोचले. पण त्यांचेही म्हणणे पथकाने ऐकले नाही. बेकायदा बांधकामाविरोधात एमएमआरडीएची ही पहिलीच कारवाई आहे. विक्रम पाटील यांनी १६ जून २०१२ ला कोळे गावातील बेकायदा इमारतीची तक्रार एमएमआरडीए व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. ती तोडण्याची कारवाई एमएमआरडीएने केली नाही. अखेर विक्रम यांनी स्वखर्चाने ती पाडली. ज्या बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात आली त्यांना बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीने दिली होती. ग्रामीण भागात १.३३ एफएसआय मंजूर असतान चार मजली इमारतीच्या बांधकाम परवानग्या ग्रामपंचायतीनी दिल्या. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवकांविरोधात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी कारवाई करणे अपेक्षित होेते. मात्र आजवर ही कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)
बेकायदा बांधकामांवर एमएमआरडीएचा हातोडा
By admin | Updated: March 24, 2017 01:04 IST