भिवंडी : भिवंडीचा सर्वांगिण विकास होण्यासाठी मेट्रो आणि रिंगरूट प्रकल्प राबविले जाणार आहे. एमएमआरडीए हे प्रकल्प राबविणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र प्रकल्पात बाधित होणाऱ्यांनी विरोधी सूर आळवल्यामुळे निवडणुकीवर डोळा ठेवत नगरसेवकांनीही आपला सूर मिसळला आहे. यामुळे नगरसवेकांच्या दुटप्पी भूमिकेचे नागरिकांना दर्शन घडले आहे.एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस मदान यांनी आपल्या पथकासह शहरात येऊन मार्गाची पाहणी केली. आमदार रु पेश म्हात्रे ,महापौर तुषार चौधरी आणि काही नगरसेवकांनी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची भेट घेऊन दोन्ही प्रकल्पास विरोध केला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो व रिंगरूट हे दोन्ही प्रकल्प राबवावेत अशी भूमिका प्रशासनाने वेळोवेळी नगरसेवकांसमोर मांडली. महासभेत दोन्ही प्रकल्पांना नगरसेवकांनी मान्यता दिली. रिंगरोड हा शहर व ग्रामीण भागातील महामार्गांना जोडणारा असून मेट्रो प्रकल्प हा कल्याण व ठाणे शहरांना जोडणारा आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प शहर व ग्रामीण भागासाठी उपयुक्त आहेत. राज्य सरकारने प्रकल्पाकरिता एमएमआरडीएकडे तीनशे कोटी दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी रिंगरोडसाठी आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत काही नगरसेवक व ग्रामस्थांचा विरोध झाल्याने या कामास सुरूवात झालेली नाही. काही महिन्यांवर महापालिका निवडणूक आल्याने दोन्ही प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या नकारात्मक भूमिकेत काही नगरसेवक सहभागी होत त्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भिवंडीच्या विकासासाठी हा प्रकल्प राबविण्याची भूमिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. आयुक्तांच्या शहराविषयीच्या या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)
मेट्रो, रिंग रोडला नगरसेवकांचा विरोध
By admin | Updated: February 9, 2017 03:54 IST