आसनगाव : शहापूर तालुक्यातील शेणवा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नंदा चवर यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. जातपडताळणी प्रस्तावाच्या पावतीवर सदस्यपदी निवडून आल्यानंतर ६ महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्राची प्रत निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक असते. तरीही, चवर यांनी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याचा ठपका ठेवत अप्पर जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केली. शेणवा ग्रामपंचायतीची निवडणूक २१ एप्रिल २०१६ रोजी झाली होती. या निवडणुकीत विद्यमान सरपंच नंदा पंढरी चवर यांनी नामनिर्देशनपत्रासोबत जातपडताळणी प्रस्तावाची पोचपावती जोडली होती. निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायतीच्या अधिनियमात बदल करून पोचपावतीवर निवडणूक लढण्याची परवानगी दिली. मात्र, जातप्रमाणपत्राची प्रत निवडून आल्यानंतर ६ महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक केले होते. तर, मुंबई उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या निकालातही जातप्रमाणपत्राची प्रत विहीत मुदतीत सादर करण्याचे बंधनकारक केल्याने नंदा चवर यांचे सदस्यत्व धोक्यात आले होते. शेणवे येथील दिलीप वरकुटे यांनी नंदा चवर यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत तक्र ार दाखल करत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ही कारवाई झाली. (वार्ताहर)
सरपंच नंदा चवर यांचे सदस्यत्व रद्द
By admin | Updated: February 23, 2017 05:47 IST