मीरा रोड : दोन दिवसांची पाणीकपात संपत नाही, तोच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मीरा-भार्इंदरमध्ये तब्बल चार दिवसांनी पाणी आले. तेही कमी दाबाने असल्याने सर्वांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यातच, बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा दोन दिवसांची पाणीकपात असल्याने आठवडा कोरडा जाणार आहे. मीरा-भार्इंदरला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लीटर तर एमआयडीसीकडून ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. लघुपाटबंधारे विभागाने सुरुवातीला ३० टक्के लागू केलेली पाणीकपात आता ४० टक्के केली आहे. शहरातील पाण्याची समस्या पाहता भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या मागणीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्टेम प्राधिकरणाची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. भाजपाने त्याचा राजकीय लाभ घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु, स्टेमची पाणीकपात सुरूच असल्याने भाजपा अडचणीत आली. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीयोजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी पाणीपुरवठा बंद, त्यात खिडकाळीजवळ जलवाहिनी फुटल्याने या पाणीटंचाईत भर पडली. त्यानंतरही कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. तो पूर्ववत होईपर्यंत पुन्हा पुढील आठवड्यातील पाणीकपात सुरू होणार आहे. एमआयडीसीमुळे फटकादोन दिवसांच्या कपातीनंतर शुक्र वारी मध्यरात्रीपासून स्टेम व एमआयडीसीचे पाणी सुरू व्हायला हवे होते. परंतु, ते रविवारी दुपारी सुरू झाल्याने शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा १०५ तासांवर गेला. नियमानुसार पुन्हा बुधवारपासून दोन दिवस कपात आहे. - सुरेश वाकोडे (कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)९३ तासांनी मिळाले पाणी१७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता पाणी आले होते. त्यानंतर, चार दिवसांनी म्हणजेच ९३ तासांनी रविवारी दुपारी १२ वाजता पाणी आले. पाण्याचा दाब कमी असल्याने आमच्या तीन विंगमधील रहिवाशांना अपुरे पाणी मिळाले. त्यातून वाद निर्माण होत आहेत. चौकशीसाठी आम्ही पाण्याच्या टाकीवर गेलो. आमच्यासाठी पाणी सोडण्याच्या वेळेला आमचे पाणी दुसऱ्याच भागाला दिल्याचा घोटाळा तेथे समोर आला. - निलेश चौधरी (अध्यक्ष, साई विकास सोसायटी, साईबाबानगर)
मीरा-भार्इंदरला चार दिवसांनी पाणी
By admin | Updated: February 23, 2016 02:23 IST