लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत रॉकेल ओतून जाळून ठार मारणाऱ्या पतीसह चौघांवर खुनाचा गुन्हा हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून तब्बल अडीच महिन्यांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला. हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसारगावातील पांडुरंग पाटील यांची मुलगी दीपा हिचे लग्न उसाटणे येथील विश्वास पाटील याच्याशी झाले. २४ जानेवारीला दीपाचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांसह नातेवाइकांना पाटील कुटुंबांनी दिली. हिललाइन पोलिसांनी त्या वेळी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तब्बल अडीच महिन्यांनंतर मुलीचा खून झाल्याचा संशय दीपाच्या आईवडिलांसह नातेवाइकांना आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे, तपास अधिकारी रोहन गोंजारी यांनी मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेतली. सुमित्रा वायले यांच्या तक्रारीवरून दीपा हिचा पती विश्वास पाटील, सासू सीताबाई, दीर संजय पाटील, सुरेखा पाटील यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. २४ जानेवारीला दीपाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला वरच्या मजल्यावरून फेकून दिले, अशी तक्रार केली आहे.
आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल
By admin | Updated: May 7, 2017 05:55 IST