लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : औषधी पदार्थ व काळू जादूच्या नावाखाली मांडूळ जातीच्या सापाची तस्करी व विक्रीसाठी एक जण डोंबिवलीजवळील ठाकुर्ली भागात येणार असल्याची माहिती ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सुजित घमंडली (३९, रा. डोंबिवली पश्चिम) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून दोन जिवंत मांडूळ साप हस्तगत करण्यात आले असून, त्याची किंमत ४५ लाखांच्या आसपास असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मांडुळाच्या तस्करीबाबत ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक मीलिन पिंगळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ८ सप्टेंबरला ठाकुर्ली-खंबाळपाडा रोडवर सापळा रचला. त्यात दुपारी २.३५ वाजता घमंडली याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एक किलो १३० ग्रॅम आणि ८०० ग्रॅम वजनाचे दोन जिवंत मांडूळ साप आढळून आले. या सापांची लांबी प्रत्येकी ४४ आणि ३६ इंच इतकी असून, त्यांची किंमत ४५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी हे मांडूळ जातीचे सर्प हस्तगत करून वनविभागाच्या ताब्यात दिले आहेत. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने हे मांडूळ कोणाकडून आणले? यात आणखी कोणती टोळी सक्रिय आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
-------------------------------