कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात अपुऱ्या जागेत असलेल्या महात्मा फुले पोलीस स्थानकाचे बुधवारी स्थलांतर झाले असून परिवहन बस डेपोजवळील इमारतीत त्यांना जागा देण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त परमवीर सिंह, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, अतिरिक्त पोलीस आयुक्त यशस्वी यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. टी. पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिकेचा सर्व समावेशक आरक्षण योजनेत ही जागा पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. ही मालमत्ता खाजगी विकासकाच्या माध्यमातून विकसीत झाली आहे. ही नवी जागा तीन हजार चौरस फुटांची आहे.पोलीस आयुक्त सिंह यांनी सांगितले, पोलिसांना जागा व वास्तू उपलब्ध करुन देणारी कल्याण-डोंबिवली ही पहिली महापालिका आहे. महापालिकेने त्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला. जागा व वास्तूसह शहरातील विविध प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या आराखड्यालाही मंजुरी मिळाली आहे. ५२ कोटींचा हा आराखडा आहे. घरत यांनी सांगितले की, पोलिसांची तुलना जागतिक पोलिसांशी केली जात असेल तर तशा सुविधा पोलिसांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी होणार असतील, तर सुरक्षाही स्मार्ट असली पाहिजे. यासाठी महापालिकने पोलिसांना नव्या वास्तू व जागा देऊ केल्या आहेत.खडकपाडा येथे नव्या वास्तूत यापूर्वीच पोलीस ठाणे सुरु झाले आहे. स्टेशन परिसरातील पोलीस उपायुक्त कार्यालयानजीक असलेला पोलीस नियंत्रण कक्षही खडकपाडा येथे हलवला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वास्तूचाही विकास केला जाणार आहे. (प्रतिनिधी)स्टेशन परिसर मोकळास्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसर मोकळा करुन तेथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहे. डोंबिवली स्टेशन परिसरातील दुकाने हटवून तो परिसर मोकळा केला. वर्षभरापूर्वी कल्याण स्टेशन परिसरातील रेल्वे न्यायालय रेल्वे पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस सुसज्ज जागेत हलविण्यात आले. तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाची इमारत नव्याने बांधली जाणार आहे. महात्मा फुले पोलिस ठाणे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
महात्मा फुले पोलीस ठाणे नव्या वास्तूत
By admin | Published: February 23, 2017 5:39 AM