मीरा रोड : खात्यात पैसे नसतानाही मोबाइल यूपीआय अॅपद्वारे बँक आॅफ महाराष्ट्राच्या भार्इंदर पूर्व शाखेतील १८ नव्या खातेदारांनी तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये एकमेकांना व अन्य सबंधितांच्या खात्यात वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोबाइल बँकींगचे आवाहन सरकारने केल्यामुळे त्या अनुषंगाने बँकांनी यूपीआय अॅप सुरू केला. हे अॅप डाऊनलोड केल्यावर त्याद्वारे खातेदार हा रोज किमान १ लाख संबंधिताच्या खात्यात पाठवू वा मागवू शकतो. या अॅपचा उपयोग करुन खात्यात पैसे नसतानाही अन्य खात्यात पैसे वळते केले जात असल्याचा धक्कादायक व्यवहार बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेत घडला. २६ डिसेंबर २०१६ ते १८ जानेवारी २०१७ दरम्यान नव्याने उघडण्यात आलेल्या प्रतिक पुजारी, जसवंत दमानिया, प्रितेश दमानिया, राज दमानिया, गजेंद्र शर्मा, रमाकांत शर्मा, विनोद शाह, देवेंद्र जयस्वाल, सुषमा जयस्वाल, विकास जयस्वाल, कल्पेश भट, रोहन साईगावकर, जयेश मोहिनी, चिराज मोहिनी, सुधा मोहिनी, सुब्रमण्यम भुवनेश्वर, अशुतोष प्रधान, कॅरोल डिसोझा अशा १८ जणांच्या खात्यात पैसे नसतानाही त्यांनी १४२ वेळा या अॅपद्वारे व्यवहार करत १ कोटी ३४ लाख ९० हजाराचा गैरव्यवहार केला. खातेदारांची खाती गोठवण्यासह ज्यांच्या बँक खात्यात अपहाराची रक्कम दिली गेली आहे त्यांची खातीही गोठविण्यासाठी संबंधित बँकांना कळवा, पैसे वसूल करा असे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने बँकेने जसवंत यांना नोटीस बजावली. त्यांनी केवळ २ लाख भरले; पण अन्य रक्कम भरलीच नाही. जसवंत यांच्या मुलांनी ३५ लाख रुपयांचा चुना बँकेला लावला. अॅपद्वारे ही रक्कम मुलांच्या व पत्नी आदींच्या खात्यात वळवण्यात आली. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र बँकेला घातला गंडा
By admin | Updated: March 29, 2017 05:28 IST