सुरेश काटे, तलासरीलग्नाचे आमिष दाखवून एका १८ वर्षीय आदिवासी तरूणीवर विवाहीत तरूणाने बलात्कार केला परंतु नंतर लग्नास नकार दिल्याने या तरूणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच गावकऱ्यांनी तरूणीला रूग्णालयात दाखल केल्याने तीचा प्राण वाचला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे. अनवीर - पाटीलपाडा येथील शैलेश मलावकर या विवाहीत तरूणाने सुत्रकार पाटीलपाडा येथील १८ वर्षीय आदिवासी तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून अनवीर-ठाकरपाडा येथे आपल्या मावशीच्या घरी नेऊन बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मी परिस्थिती पाहुन दोन तीन दिवसात तुझ्याशी लग्न करतो असे सांगितले. परंतु विवाहीत असलेला शैलेश हा तरूणीला टाळू लागला व मी विवाहीत असल्याने तुझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे सांगताच तरूणीला धक्का बसला यातून नैराश्य आल्याने तीने तलासरीजवळ असलेल्या जंगलामध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष पिऊन बेशुद्ध पडलेल्या या तरूणीला गावकऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयात वेळीच दाखल केल्याने तीला वाचविण्यास डॉक्टरांना यश आले. याबाबत तलासरी पोलीसांनी चौकशी केली असता शैलेशने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला व लग्नास नकार दिल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तपासणीसाठी महिला डॉक्टर नसल्याने तीला डहाणू उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तलासरीत रूग्णालय असतांना रूग्ण डहाणूत कशाला आणता असा उद्धट सवाल पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्याने केला.
प्रियकराने फसविले, प्रेयसीने घेतले विष
By admin | Updated: January 8, 2016 01:57 IST