ऑनलाइन लोकमत
ठाणे - सारस्वतांना मानाचा मुजरा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 'लोकमत साहित्य पुरस्कार' देण्यात येणार असून, या पुरस्कारांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
कथा, कादंबरी. कविता, ललित गद्य, बालसाहित्य, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक, अनुवाद, विज्ञान अशा नऊ विभागातील साहित्य कलाकृतींसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठासाठी ११ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा या पुरस्कारांसाठी विचार करण्यात येईल. याशिवाय साहित्य निर्मितीत प्रदीर्घ काळ व लक्षणीय कामगिरी करणाऱ्या एका प्रतिभावंताला एक लाख रुपयांचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार योजनेचे हे चौथे वर्ष असून, पुरस्कार योजनेची नियमावली आणि प्रवेशिका www.lokmat.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेशिकेसोबत तीन पुस्तकांच्या प्रती लोकमत, ठाणे कार्यालय, सरस्वती भुवन, दुसरा मजला, मल्हार टॉकीजसमोर, संत नामदेव चौक, नौपाडा, ठाणे (पश्चिम) या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.