खोपोली : अॅडलॅब इमॅजिका कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी आमदार सुरेश लाड गेले असताना, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी अॅडलॅब इमॅजिकाच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याने खालापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. थीम पार्कचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक ईवान यांना १० ते १२ समर्थकांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. कामावरून कमी केलेले कामगार तय्यब खान यांनी आपल्याला पुन्हा कामावर घ्यावे, यासाठी बुधवारी सकाळी उपोषण सुरू केले होते. अॅडलॅब विरोधातील या उपोषणाला भेट द्यायला आमदार सुरेश लाड आले असता, आमदार व उपोषणकर्त्यांशी बोलणी करण्यास अधिकारी ईवान यांनी टाळाटाळ केली. आमदारांसमोर सिगारेट ओढत, १५ मिनिटे टाइमपास केल्यामुळे आमदार समर्थक चिडले व त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार सुरेश लाड व कंपनीचे व्यवस्थापन यांच्यात तडजोड होऊन तय्यब खान यांना पुन्हा कामावर घेण्याची तयारी व्यवस्थापनाने दाखवल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले व तणावाचे वातावरण निवळले. अलीकडेच आमदार लाड यांनी उपजिल्हाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर असतानाच, ही घटना समोर आली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला नाही, तर पार्क प्रशासन तक्र ार दाखल करण्यास तयार नाही. आमदारांचा आदर आहे. मात्र, हा प्रकार गैरसमजुतीतून झाला असावा, असे पार्कचे प्रमुख आशुतोष काळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
लाड समर्थकांची अॅडलॅबच्या कर्मचाऱ्यास मारहाण
By admin | Updated: December 23, 2016 03:16 IST