नारायण जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधीच विस्तीर्ण सागरकिनारा अन् त्यात तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प या कारणांमुळे पालघर जिल्ह्यात पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या मे महिना सुरू झाला असून पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. परंतु, तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लाइटनिंग अरेस्टर अर्थात वीजअटकाव यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा प्रशासन आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या अनास्थेमुळे धूळखात पडून आहे. यामुळे जिल्ह्यातील २७८४ शाळांमधील सव्वापाच लाखांहून अधिक विद्यार्थी आणि शेकडो आदिवासी गावपाड्यांतील ग्रामस्थांचा जीव टांगणीला आहे. यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी वीज पडून होणाऱ्या संभाव्य मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी ही वीजअटकाव यंत्रणा बसवण्याची गरज निर्माण झाली आहे.तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या सरकारी कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून ही वीजअटकाव यंत्रणा बसवण्यासाठी पुढाकार घेतला होता. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संन्याल यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, नंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून केवळ स्मशानभूमीच्या भिंती बांधणे, शेड उभारण्यावर भर दिल्याने वीजअटकाव यंत्रणेचा प्रस्ताव बासनात गुंडाळला असल्याचे खास सूत्रांनी सांगितले. वास्तविक नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिकांसह राज्यातील सामाजिक न्याय विभागानेही आपल्या राज्यभरातील आश्रमशाळांमध्ये वीजअटकाव यंत्रणा बसवून संभाव्य धोके टाळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु, ज्या भागात खऱ्या अर्थाने वीज कोसळण्याचा धोका आहे, त्या पालघर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनासह न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या सरकारी कंपनीसह इतर खासगी कंपन्यांनीही अनास्था दाखवली आहे. ठाणे जिल्ह्यातही याबाबत उदासिनता आहे.पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील बहुसंख्य शाळा तळ मजल्याच्याच आहेत. यामुळे या भागात विशिष्ट उंचीचे मनोरे उभारून ही वीजअटकाव यंत्रणा बसवण्याची गरज आहे. सामाजिक न्याय विभागाने सूचित केलेल्या पुणे येथील एसव्हीए इलेक्ट्रिकल्ससारख्या कंपन्यांनी नवी दिल्ली येथील भारतीय प्रमाणक संस्थेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड भागांत आतापर्यंत वीजअटकाव यंत्रणा बसवली आहे. ज्या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येते, त्या ठिकाणांपासून पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर सुरक्षित होतो. त्या भागात वीज कोसळण्याचे प्रमाण नगण्य होते. यामुळे प्राथमिक २२०० आणि माध्यमिक ५८४ अशा २७८४ शाळाच नव्हे, आजूबाजूच्या शेकडो गावपाड्यांना यातून संरक्षण मिळणार आहे.
वीजअटकाव यंत्रणेचा जिल्ह्यात अभाव
By admin | Updated: May 9, 2017 01:03 IST