जव्हार : जव्हार तालुक्यातील चांभारशेत गावच्या ७०० मजुरांनी २५ मार्चपासून ७ जूनपर्यंत रोजगार मिळावा म्हणून रितसर अर्ज भरून कामांची मागणी केली होती. परंतु संबंधीत प्रशासनाने त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार न पाडता नियमाप्रमाणे मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या काम देणे बंधनकारक असताना आजतागायत त्या मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. या बाबत कष्टकरी संघटनेने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर थोडेफार काम सुरू केले. परंतु त्यात सर्वांनाच काम मिळाले नाही. तसेच ज्या मजुरांना काम मिळाले त्यांना अल्पकाळासाठीच काम मिळाले. त्या तुटपूंज्या मजुरीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे शक्यच नसल्याने गोरगरीब मजुर मिळेल त्या ठिकाणी व कमी मजुरीवर इतर खाजगी कामांवर जावून कसाबसा कुटूंबाचा गाडा हाकत असतात. प्रशासनाच्या या बघ्याच्या भुमिकेचा निषेध तसेच बेरोजगार भत्ता त्वरीत द्यावा या मागणीसाठी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली शेकडो बेरोजगार मजुरांनी मोर्चा काढत तहसिल कार्यालयासमोरच रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र बेरोजगार भत्ता नियम २०१२ नुसार मजुरी न मिळालेल्या मजुरांनी बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी रितसर अर्ज केले. परंतु दोन महिने उलटुनही प्रशासनाने मजुरांना त्यांच्या हक्काचा बेरोजगार भत्ता अदा केला नाही. कष्टकरी संघटनेतर्फे जव्हार तहसिलदार अरूण कनोजे यांना दिलेल्या लेखी निवेदनात मजुरांना बेरोजगार भत्यासाठी कार्यालयासमोर भर उन्हात उपाशी आंदोलन करावे लागते ही लज्जास्पद बाब असुन प्रशासनावर हा एक मोठा कलंक आहे. बेरोजगार भत्यामध्ये तीन महत्वाचे घटक समाविष्ट आहेत. केंद्राने रोजगार हमी योजनेतील हमी हा शब्द काढून टाकावा अशी टीका लोबो यांनी केली. म. गा. रा. ग्रा. रो. ह. योजना या मुळ संकल्पनेलाच जव्हार महसुल विभागाकडून मुठमाती मिळत त्यांच्या निष्क्रीयतेमुळे जव्हार तालुक्यातील मजुरांना वेळेवर व पुरेशी कामे नाहीत व गावागावात आजपर्यंत टिकावू मालमत्ता तयार झालेलीच नाही. समाजिक अंकेक्षणाच्या प्रक्रियेत निधीचा गैरव्यवहार व गैरवापर झाल्याचे पुराव्यासह सिद्ध झाले तरी अद्यापही दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली नाही? या गैरव्यवहाराबाबत व दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी याकरीता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. (वार्ताहर)चावडीवर होणार कामांचे कामांचे वाचन... १) आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार कनोजे यांची भेट घेतली. यावेळी कनोजे यांनी कष्टकरी संघटनेने केलेला निषेध मान्य आहे असे म्हटले. त्यांनी २०११ मध्ये या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्य करत आता २०१५ मधील अनेक कामांच्या आराखड्यास मंजुरी दिली असून लवकरच कामांना सुरूवात होईल, असे सांगितले. २) तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळांनी १०९ गावात प्रत्येक विभागामार्फत कामे सुरू करण्याबाबतची प्रक्रिया प्रगतीपथावर असून जव्हार तालुक्यातील एकूण २२,४८० जॉबकार्डधारक (मजुर) यांना शासन निर्णयाप्रमाणे वर्षातील १०० दिवस काम मिळावे यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. कामाच्या नियोजनानुसार प्रत्येक मजुरांना कामांना सुरूवात होणार आहे. याच्या माहितीसाठी प्रत्येक चावडीवर कामांचे चावडी वाचन केले जाइल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.३) या आश्वासनाने आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी कागदोपत्री कामे व कागदोपत्री मजुरी दाखवितात प्रत्यक्षात काहीच होत नसल्याचा आरोप प्रशासनावर केला. या शिष्टमंडळाच्या चर्चेदरम्यान तहसिलदार अरूण कनोजे, बी.डी.ओ शेखर सावंत, तालुका कृषी अधिकारी बिरासदार, वनविभागाचे, सामाजिक वनीकरण, सा. बा. विभागाचे अधिकारी हजर होते.
कष्टकरी संघटनेची जव्हार तहसील कार्यालयावर धडक
By admin | Updated: September 8, 2015 23:28 IST