ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड आग्रही असून, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना चितपट करण्याकरिता आव्हाड यांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी एकाच पक्षात राहून आडूनआडून राजकीय वैर जपलेल्या आव्हाड-डावखरे यांच्यातील थेट सामना पाहायला मिळणार आहे.डावखरे यांच्याशी असलेल्या स्पर्धेमुळे राष्ट्रवादीच्या वतीने आव्हाड हे डावखरे यांना घेरण्याकरिता मैदानात उतरत आहेत, तर भाजपाचे नाक कापण्याकरिता शिवसेनेने संजय मोरे यांना रिंगणात उतरवल्याने सेनाही डावखरे यांनाच आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानणार आहे. त्यामुळे डावखरे यांना एकाच वेळी आव्हाड व शिवसेना यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. परिणामी, इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक रंगतदार होणार, हे स्पष्ट झाले आहे. तीनही उमेदवार ठाण्यातील असल्याने या निवडणुकीकडे समस्त ठाणेकरांचे लक्ष लागणार आहे. वसंत डावखरे व जितेंद्र आव्हाड हे दोघेही शरद पवार यांचे समर्थक. डावखरे यांची ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर फार पूर्वीपासून पकड. आव्हाड हे डावखरे यांच्या तुलनेत तरुण पिढीचे प्रतिनिधी. आव्हाड हे जर ठाण्याच्या राजकारणात मोठे झाले, तर आपली डोकेदुखी वाढेल. त्याचबरोबर, पुत्र निरंजन यांच्या राजकीय वाटचालीत अडचण निर्माण होईल, यामुळे डावखरे हे वेगवेगळ्या मार्गांनी आव्हाड यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे आणि वसंत डावखरे यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. मात्र, आव्हाड यांना वाढू न देण्याकरिता डावखरे-नाईक यांची युती होती. नाईक यांचे पुत्र संजीव यांनाही आव्हाड डोकेदुखी ठरतील, अशी भीती असल्याने नाईक हेही आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेत आले. आव्हाड हे दीर्घकाळ विधान परिषदेचे सदस्य होते. थेट लोकांमधून निवडून येत नसल्याने पवार यांनीही आव्हाड यांचा वापर आंदोलने करणे, घोषणाबाजी करणे, असा मर्यादित केला. मतदार संघ पुनर्रचनेत कळवा-मुंब्रा हा मतदार संघ तयार झाला व आव्हाड यांनी आपले लक्ष केंद्रित करून या मतदार संघावर कब्जा केला.तेव्हापासून ठाण्याच्या राजकारणात डावखरे यांचे महत्त्व कमी होत गेले व आव्हाड आक्रमक झाले. आता तर वसंत डावखरे यांची छत्रछाया निरंजन यांच्यावर नसल्याने आव्हाड राजकीय उट्टं काढण्याकरिता सरसावले आहेत. नजीब हे त्यांचे विश्वासू असल्याने आणि त्यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटू लागल्याची चर्चा आहे. नाईक आव्हाड यांच्या उमेदवाराला किती सहकार्य करणार, याबाबत कुतूहल आहे. साहजिकच, नजीब यांना निवडून आणण्याकरिता आव्हाड यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
कोकण पदवीधर : डावखरे-आव्हाड संघर्ष रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 11:30 PM