कल्याण : केडीएमसीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देणे नागरिकांना बंधनकारक केले आहे. मात्र, याच वर्गीकरणाला धाब्यावर बसविणाऱ्या कंत्राटदाराकडून ‘क’ प्रभागाचे काम केडीएमसीने मार्चमध्ये काढून घेतले होते. दरम्यान, ही हलगर्जी तशीच सुरू राहिल्याने कंत्राटदाराचे ‘जे’ प्रभागातील चार वॉर्डांचे कचरा संकलनाचे काम बंद केले आहे यासंदर्भातील आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी गुरुवारी जारी केले असून, त्यानुसार संबंधित वॉर्डामध्ये केडीएमसीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
केडीएमसीतील १० प्रभागांपैकी ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘जे’ या चार प्रभागातील कचरा संकलन करण्यासाठी आर ॲण्ड बी इन्फ्रा या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या प्रभागातील नागरिकांच्या घरातील कचरा कंत्राटदाराच्या कामगारांकडून गोळा केला जात आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून देणे नागरिकांना बंधनकारक केले आहे; परंतु कंत्राटदाराकडून मात्र घरोघरी कचरा गोळा करताना तो वर्गीकरण न करता एकत्रित करून डम्पिंगवर नेला जात असल्याने वर्गीकरण संकलनाला ‘हरताळ’ फासला जात असल्याकडे नागरिकांनी लक्ष वेधले होते.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर झाली कारवाई
- कंत्राटदाराने चोखपणे काम करणे अपेक्षित असताना, होत असलेला हलगर्जीपणा पाहता ‘लोकमत’ने ‘कचरा वर्गीकरणाला कंत्राटदाराची तिलांजली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ‘क’ प्रभागात कंत्राटदाराचे सुरू असलेले काम बंद करून तेथे केडीएमसीचे कर्मचारी तैनात केले आहेत.
- मात्र कंत्राटदाराचा हलगर्जीपणा पुढेही जैसे थे सुरू राहिल्याने गुरुवारी त्याच्याकडून ‘जे’ प्रभागातील वॉर्ड क्रमांक ४२ लोकग्राम, ४३ गावदेवी नेतिवली मेट्रोमॉल, ४४ नेतिवली टेकडी आणि ४५ कचोरे या चार वॉर्डांतील काम काढून घेण्यात आले आहे.
----------------------------