कल्याण : एका गुन्ह्याचा तपास करीत असताना कल्याण रेल्वे पोलिसांना शहराच्या पूर्व भागातील आनंदवाडी परिसरातील एका घरातून दोन गोण्या भरून शस्त्रे सापडली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरारी आहे. त्याच्या अटकेनंतर या शस्त्रसाठ्याचे रहस्य उलगडणार आहे. एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आनंदवाडी परिसरातील डबल टॉवर इमारतीत पोहोचले. तेथील दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीची पोलिसांनी झडती घेतली असता तेथे दोन गोण्या भरून धारदार शस्त्रे आढळली. त्यात चॉपर, गुप्ती आणि तलवारी आदींचा समावेश आहे. हा प्रकार पाहून पोलीसही थक्क झाले. इतका शस्त्रसाठा कशासाठी गोळा केला असावा, याचा पोलीस तपास करत आहेत. या शस्त्रसाठ्याप्रकरणी या खोलीत राहणारा तरुण तुषार व एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या इमारतीतील तळ मजल्यावर राहणारे चंदू म्हात्रे यांनी त्यांना वरच्या मजल्यावरील खोली भाड्याने दिली होती. या तरुणांसोबत अन्य एक तरुण आहे. तो अजूनही फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज चोरीच्या किमान पाच घटना घडतात. त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कल्याण रेल्वे पोलिसांच्या हाती धारदार शस्त्रांचा साठा लागल्याने या घटनेचा तपास विविध अंगाने केला जाणार आहे.
कल्याणला दोन गोण्या भरून सापडली शस्त्रे
By admin | Updated: July 7, 2016 02:46 IST