उल्हासनगर : शहरात कबरस्तानला दोन भूखंड मिळूनही तांत्रिक कारणाने हस्तांतरण प्रक्रिया लांबली आहे. २० वर्षांपासून मुस्लिम समाज कबरस्तानची मागणी करीत असून दफनविधीसाठी त्यांना कल्याण अथवा अंबरनाथला जावे लागते. मात्र, तांत्रिक कारणाने हस्तांतरण आणि ताबा प्रक्रिया लटकल्याने मुस्लिम संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला.उल्हासनगरात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. मात्र, शहरात कबरस्तान नसल्याने त्यांना दफनविधीसाठी कल्याण अथवा अंबरनाथ येथे जावे लागते. यामुळे मुस्लिम समाज नाराज आहे. तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी समाजाने विविध आंदोलने केली. प्रत्येक वेळी आश्वासने मिळाली. पण, कार्यवाही शून्य. अखेर, दफनविधी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ करण्याचा निर्णय मुस्लिमबांधवांनी घेतला. या प्रकारामुळे पालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशान्वये म्हारळ गावाजवळील २ एकरचा भूखंड यासाठी दिला. दुसरीकडे महासभेने कबरस्तानसाठी एकाच वेळी दोन भूखंड मान्य केले. महापालिकेच्या परवानगीनंतर म्हारळ गावाजवळील कबरस्तानच्या भूखंडावर दोन मृतदेहांचे दफनही झाले. मात्र, त्यानंतर कबरस्तानात मृतदेहाचे दफनविधी करण्यास न्यायालयाने मनाई केली. तसेच कॅम्प-५ येथील भूखंड खाजगी ठेकेदाराच्या ताब्यात आहेत. या प्रकाराने मुस्लिम समाजाला आजही मृतदेह ९ ते १० किमी लांब असलेल्या कल्याण व अंबरनाथ येथे न्यावे लागत आहेत. मृतदेहाच्या होणार हेडसांडीमुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी असून दोनपैकी एकतरी भूखंड यासाठी ताब्यात देण्याची त्यांची मागणी आहे. न्यायालय व शासनाने कबरस्तानासाठी पर्यायी जागा देण्याचे आदेश पालिकेला दिले. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याने मुस्लिमबांधवामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. समाजसेवक अनिल सिन्हा व एकलाख शेख यांनी मुस्लिमबांधवाच्या हक्काच्या कबरस्तानसाठी उल्हासनगर ते दिल्लीदरम्यान पदयात्रा सुरू केली. रविवारी ते राजस्थानमधील अजमेरला पोहोचले आहेत. दिल्लीला गेल्यावर पंतप्रधानमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह अर्थमंत्री यांना कबरस्तान त्वरित हस्तांतरण करण्याची मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात कबरस्तानाचा मुद्दा ऐरणीवर
By admin | Updated: April 24, 2017 23:58 IST