डोंबिवली - भरमसाठ वीज बिल, फॉल्टी मीटर, कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा विविध तक्रारींची गंभीर दाखल घेऊन शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली डोंबिवलीकर जनतेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर धडकमोर्चा काढून वीज कंपनीविषयी खदखदत असलेल्या असंतोषाला शनिवारी वाट मोकळी करून दिली.
यावेळी युवासेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे, सभागृहनेता राजेश मोरे, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, महिला शहर संघटक कविता गावंड, विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेविका वैशाली दरेकर, सारिका चव्हाण, विभाग प्रमुख अमोल पाटील, उपशहर संघटक किरण मोंडकर आणि शिवसैनिक उपस्थित होते.
वीज समस्यांबाबत असलेल्या नागरिकांच्या तक्रारींसंदर्भातील निवेदन कार्यकारी अभियंता यांना यावेळी देण्यात आले असून यावर तातडीने कारवाई न केल्यास शिव सैनिकांतर्फे शिवसेना पद्धतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शहर कायमस्वरूपी लोडशेडिंग मुक्त करावे तसेच, अचानकपणे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे इलेक्ट्रोनिक वस्तू खराब होऊन होणारे नुकसान थांबविणे, वीज बिल घरपोच योग्य वेळी न येणे, मोबाईलवर आलेले बिल दाखवून भरण्यात आलेले बिल स्वीकारणे, टोल फ्री वर केलेल्या तक्रारीची दखल घेणे अशा विविध तक्रारींचा पाढा यावेळी डोंबिवलीकरांनी यावेळी वाचला.
रस्त्यांच्या बाजूला वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे डी.पी. आणि ट्रान्सफॉर्मर हटवण्यात यावेत, डोंबिवली एम.एस.ई.बी मध्ये रात्रीच्या वेळी पॅावर हाउसला फक्त एकच कर्मचारी असतो, त्याठिकाणी नियमानुसार २ कर्मचारी असावेत, डोंबिवलीमध्ये ३ फेज डी.बी जंक्शन आहेत, त्या डी.बी मध्ये बहुतेक केबलचे लग जळलेल्या स्थितीत आहेत तसेच, ३ फेज जंक्शनवर कव्हर नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याकडे यावेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
सेनेतील दोन गट उघडगुरुवारी भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांनी महावितरण ला निवेदन दिले, शुक्रवारी मनसेने कोळसा दिला, तसेच शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही निवेदन दिले होते. त्यानंतर शहरात फारसे भारनियमन नाही. पण तरीही शनिवारी सेनेने हा मोर्चा का काढला? सेनेतील दोन गट यावरून स्पष्ट समोर आले. पक्षात एकवाक्यता नसल्याचे हे द्योतक असल्याची टीका मनसे शहरप्रमुख मनोज घरत यांनी केली.