ठाणे : स्थायी समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा वाद सुरू असतानाच सर्वपक्षीय नेत्यांच्या सहमतीने करण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांची निवड आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रद्द केली आहे. ही निवड कायद्यानुसार झालेली नसून ज्या पाच जणांची नावे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली, त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा दर्जा देता येणार नाही, असे पत्र आयुक्तांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांना पाठवून धक्का दिला आहे.२० एप्रिलच्या महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेचे राजेंद्र साप्ते, दशरथ पालांडे, जयेश वैती, राष्ट्रवादीचे मनोहर साळवी आणि भाजपचे संदीप लेले यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याची घोषणा केली होती. त्या सदस्यांना आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे. आयुक्तांच्या शिफारशीशिवाय ही सदस्यनिवड करता येत नसल्याचे कायदा सांगतो. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पालिकेच्या सभागृहात असावेत यासाठी स्वीकृत सदस्य निवडीची तरतूद करण्यात आली आहे. पण राजकीय सोय लावण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय नेत्यांकडून होतो. त्यामुळे जी पाच नावे या पक्षांनी सुचवली, ती स्वीकृत सदस्यांच्या निकषात बसत नसल्याच्या मुद्द्यावर आयुक्तांनी ही नावे फेटाळून लावली आहेत. आयुक्तांची शिफारस आली नसल्याने गटनेत्यांच्या नावांचे वाचन महापौरांनी केले. तशी घोषणा झाली, तरी त्याला गॅझेटमध्ये प्रसिध्दीचे अधिकार प्रशासनाला आहेत. ती तेथे प्रसिध्द न झाल्यास ते सदस्य स्वीकृत सदस्य होऊ शकत नाहीत. आयुक्तांनी ही निवड बेकायदा ठरवल्याने या पाच जणांची नियुक्ती रद्द झाली आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यातील सर्व स्वीकृत नगरसेवक ठरले अपात्र
By admin | Updated: May 5, 2017 06:01 IST