अंबरनाथ - विम्कोनाका ते गावदेवी या रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान पालिकेने अनेक दुकाने आणि घरांवर कारवाई केली. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळेच ही कारवाई पालिकेने केल्याचा आरोप शुभांगी जाधव यांनी केला आहे. ही कारवाई करावी, यासाठी शुभांगी जाधव या महिलेने पालिका आणि शासनासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कारवाई करताना गावदेवी चौकातील रस्त्याचे रुंदीकरणही होणार असताना तेथे असलेले आठ गाळे मात्र तसेच ठेवण्यात आले आहे. यासोबत एका शाळेच्या तीन मजली इमारतीवरही पालिकेने कारवाई केलेली नाही.अंबरनाथ नगर परिषदेची कारवाई एकतर्फी असून रस्त्यामध्ये बाधित होणारी दुकाने वाचवण्याचे काम पालिकेने केले आहे. विकास आराखड्यातील रस्त्याप्रमाणे या रस्त्यावरील अनेक दुकाने बाधित होतात. मात्र, कारवाई करताना एकाच बाजूच्या दुकानावर कारवाई करून बिल्डर लॉबीला मदत करण्याचा प्रयत्न पालिका आणि राजकीय पुढाºयांनी केल्याचा त्यांचा आरोप आहे.गावदेवी मंदिराला लागून असलेले गाळे तोडण्याची धमकी पालिका प्रशासन आणि राज्य शासन देत नसल्याने त्यांच्या नाकर्तेणाला विरोध दर्शवण्यासाठी आपण उपोषण सुरू केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी देऊनदेखील पालिकेने केवळ नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही केलेली नाही. जोपर्यंत या बांधकामावर कारवाई होत नाही, तोवर हे उपोषण सुरूच राहील, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ पालिकेसमोर ठिय्या : अतिक्रमणाविरोधात महिलेचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:16 IST