अंबरनाथ : अंबरनाथच्या वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी अटकेत असलेला टँकरमाफिया धीरज धुमाळ याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. धुमाळ याची कोठडी आता २४ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत कुठलीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी वालधुनी नदीत सोडण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी टँकरमाफिया धीरज याला बेड्या ठोकल्या होत्या तर त्याचा एक टँकरही जप्त करण्यात आला होता. त्यानंतर धुमाळ याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे धुमाळ याचे आणखी दोन टँकर अंबरनाथ पोलिसांनी जप्त केले असून अन्य टँकरचालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात धुमाळ याला ज्या कंपन्या रासायनिक सांडपाणी नदीत सोडायला सांगत होत्या त्या कंपन्यांच्या विरोधातही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. नेमक्या कोणत्या कंपन्या रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी धीरज याच्याकडे काम देत होते याचा शोध घेत आहेत.