भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे भाजपात इनकमिंग सुरू झाले आहे. नव्याने येणाऱ्यांमुळे निष्ठावंतांनी नाराज होण्याचे कारण नाही. या मंडळींना घेऊन काम करा. नव्याने आलेल्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना सत्तेत सहभागी करून घेऊ, असा सबुरीला सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे केला. दानवे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी, काँग्रेसमधील काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, अशोक तिवारी, परशुराम म्हात्रे, नगरसेविका वत्सला पाटील, वंदना मंगेश पाटील यांनी तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील, मनीषा पिसाळ, रेखा विरोणी, नगरसेवक हंसुकुमार पांडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन म्हात्रे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी दानवे बोलत होते.राज्यातील २१० जिल्हा परिषदा, २५ नगरपालिका, १० महापालिका भाजपाच्या ताब्यात आल्याने भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांना सामावून घेण्याची ताकद एकट्या भाजपाचीच असल्याचा दावा त्यांनी केला. केवळ पदासाठी काम करू नये. पालिका निवडणुकीत भाजपाच्याच सत्तेचा अंदाज येत असल्याने इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेत आहेत. जेवढ्या निवडणुका आपण जिंकलो तेवढ्या निवडणुका काँग्रेसचे नेते राहुल गांधी हरल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी आ. नरेंद्र मेहता यांनी पालिका निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळेल, असा दावा केला. (प्रतिनिधी)निष्ठावंत व्हाटस्अॅप ग्रूपमधून बाहेर : राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत गेलेल्या निष्ठावंतांशी माजी आमदार गिल्बर्ट मेडोन्सा सतत संपर्कात होते. त्यामुळे शक्तीप्रदर्शनासाठी सोबत गेलेले पुन्हा पक्षातच राहणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या व्हाटस्अॅप ग्रूपमध्ये समावेश असलेल्या गयारामांना निष्ठावंतांनी गद्दार ठरवून त्यांना ग्रूपमधून बाहेर काढले. हसनाळे-शिंदे राष्ट्रवादीतच‘लोकमत’च्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना हसनाळे-शिंदे यांना पक्षाच्या नेतृत्वाने महत्त्वाच्या पदावर संधी दिल्याची आठवण करुन दिली होती. तसेच गटनेते बर्नड डिमेलो यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्याने त्यांनी पक्षांतराचा विचार सोडून राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी शिंदे यांच्याशी सतत साधलेल्या संपर्काला तिलांजली मिळाली. तसेच शिवसेनेनंतर भाजपाच्या संपर्कात असलेले नगरसेवक रवींद्र माळी यांनीही भाजपातील प्रवेशाला बगल दिली. मात्र ते शिवसेनेत जाणार असल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारी न मिळाल्यास सत्तेत घेऊ
By admin | Updated: March 29, 2017 05:26 IST