डोंबिवली : शहरात नियमबाह्य, मुदत संपलेल्या तसेच भंगार रिक्षा चालणाऱ्यांविरोधात कल्याण आरटीओने जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आता मंगळवारपासून आरटीओने विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.येत्या दोन-तीन दिवसांत शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या बेकायदा वाहतुकीमुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यापार्श्वभूमीवर स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन, रिक्षा आदी गाड्यांची तपासणी केली जाणार आहे, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले.कल्याण-डोंबिवली परिसरात अधिकृतपणे ९०० हून अधिक वाहने विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. त्या शिवायही वाहने विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करतात. मात्र, त्यांची आकडेवारी मिळू शकलेली नाही. ते शोधण्याचे आव्हान आरटीओपुढे आहे. त्यासाठी अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना नाईक यांनी पथकांना दिल्या आहेत. एकाच वेळी कल्याण, डोंबिवलीत ही पथके कारवाई करतील. त्यात संबंधित वाहनांत दोष आढळल्यास ती जप्त केली जातील. कागदपत्रे तपासणीत बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जप्त केलेली वाहने कल्याण आरटीओ कार्यालयात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्कूल बसची ठिकठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने बसच्या परवानग्या, नियमांचे पालन, कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्याची पूर्तता केलेली नसल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल. तसेच ज्या रिक्षांमधून वाहतूक होते, त्या रिक्षांची क्षमता, त्यांना दिलेल्या परवानग्या, कागदपत्रांची पाहणी, आसनव्यवस्था आदींची पाहणी केली जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक केल्यास कारवाई
By admin | Updated: June 15, 2016 02:29 IST