अनिकेत घमंडी, डोंबिवलीप्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत गेल्या गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात ६५ कंपन्यांसह सुमारे तीन हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार रहिवाशांचे सहा कोटींचे नुकसान झाले आहे. कंपन्यांचे नेमके किती नुकसान झाले याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे पंचनाम्यांचा अहवाल राज्य शासनाला देण्यास काहीसा विलंब होणार आहे. तो अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानंतरच भरपाईचे स्वरुप ठरेल. त्यालाही अवधी लागणार आहे.पंचनामे करणारे अधिकारी-कर्मचारी चार दिवस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने हा अहवाल देण्यास त्यांना पुढच्या आठवड्यातच वेळ मिळेल. ज्या कंपन्यांनी विमा उतरविला आहे, त्यांना किती-कशी भरपाई मिळू शकते, याचीही माहिती घेणे सुरू आहे. स्फोटाच्या हादऱ्यांमुळे ज्या घरांचे नुकसान झाले, त्यात आजुबाजुच्या बहुतांश घरांतील काचेच्या खिडक्या, दरवाजे, काही ठिकाणी भिंतींना तडे जाणे असे नुकसान झाले आहे. अनेकांचे फ्रीज, टीव्ही यांसह अन्य विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्याने अनेकांनी सरकारी मदतीची वाट न पाहता दुरूस्तीची कामे सुरू केली आहेत.भिवंडीत गोदामातील ताग्यांना आगभिवंडी : कणेरी भागातील आग्रा रोडवर असलेल्या महेश डाइंगच्या पहिल्या मजल्यावरील गोदामातील कपड्यांच्या ताग्यांना गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. भिवंडी महापालिकेसह अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दुपारी २ च्या सुमारास आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव राज्य राखीव दलाची एक तुकडी घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.महेश डाइंगमध्ये कच्च्या कापडावर प्रक्रिया केली जाते. या डाइंगच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात रंगवलेल्या व फिनिशिंग केलेल्या कापडाचा साठा होता. या कापडाच्या ताग्यांना आग लागली. डाइंगमध्ये आग विझवण्याची कोणतीही साधनसामग्री नव्हती. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. ती दोन मजली इमारतीत सर्वत्र पसरली. ती आटोक्यात आणताना भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाची दमछाक झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी अथक प्रयत्न करून दुपारी २ वाजता आग आटोक्यात आणली. (प्रतिनिधी)
स्फोटामुळे घरांचे ६ कोटींचे नुकसान!
By admin | Updated: June 3, 2016 01:57 IST