उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच समितीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले असून, त्यांचे मोबाइलही नॉटरिचेबल झाले. दरम्यान, समिती सदस्य असलेले भाजप समर्थक व साई पक्षाचे गजानन शेळके शिवसेनेच्या गळ्याला लागल्याने भाजप व शिवसेना आघाडीची संख्या समसमान होऊन घोडेबाजार तेजीत असल्याची टीका होत आहे.उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. स्थायी समितीमधील एकूण १६ पैकी भाजपचे आठ, भाजप समर्थक साई पक्षाचा एक, शिवसेना पाच, रिपाइं एक व राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. साई पक्षाच्या समर्थक सदस्यांमुळे भाजपचे समितीमध्ये स्पष्ट बहुमत आहे. दरम्यान साई पक्षाचे समिती सदस्य शेळके गेल्या महिन्यापासून नॉटरिचेबल झाले असून, ते शिवसेना आघाडीच्या गळ्याशी लागल्याचे बोलले जात आहे. शेळके यांच्यामुळे भाजप व शिवसेना आघाडीची संख्या समसमान होऊन समिती सभापतिपदासाठी समिती सदस्य फोडाफोडीला सुरुवात झाली.शेळके यांच्या शिवसेना जवळीकतेमुळे भाजपला धक्का बसला आहे. पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सभापतिपदाचे स्वप्न भंगणार असल्याचे बोलले जात आहे. उपमहापौर भगवान भालेराव हे सभापतिपदासाठी शिवसेना आघाडीकडून इच्छुक आहेत. मात्र शिवसेनेतील एका गटाचा त्यांना विरोध असल्याने, दुसऱ्या एखाद्या सदस्याचे नाव पुढे येण्याची शक्यता एका स्थानिक शिवसेना नेत्याने नाव प्रसिद्ध ना करण्याच्या अटीवर दिली.भाजपचे स्थायी समितीच्या सदस्यात फोडाफोडी टाळण्यासाठी पक्षाचे एकूण आठ सदस्य अज्ञातस्थळी गेले आहे, तर शिवसेनेचे पाच, रिपाइं एक, राष्ट्रवादी एक व शेळके असे आठ समिती सदस्य ठाणे जिल्ह्याच्या एक नेत्याच्या नजरेखाली एका हॉटेलमध्ये नजरकैदेत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आघाडीकडून वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्या समिती सदस्यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार असल्याची माहिती शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली, तर यावेळी भाजप शिवसेनेला धक्का देणार असल्याची माहिती भाजपने दिली आहे.भालेराव यांच्या भूमिकेकडे लक्ष?उपमहापौर भगवान भालेराव हे स्वतः समिती सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या भूमिकेकडे शिवसेना आघाडी व भाजपचे लक्ष लागले आहे. सभापतिपदासाठी भालेराव यांनी शिवसेनेकडे साकडे घातले. शिवसेनेने त्यांना सभापतिपदासाठी उमेदवारी दिली नाही तर ते भाजपमध्ये जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:27 IST