ठाणे : महिलांचा उत्साह... नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार, त्यांच्या कर्तृत्त्वाला दिलेली पोचपावती, मान्यवरांचे मार्गदर्शन यातून जागतिक महिलादिनाची पूर्वसंध्या सजली. निमित्त होत, विश्वास सामाजिक संस्था आणि लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘सलाम ‘ती’ च्या कर्तृत्वाला’ या विशेष कार्यक्रमाचे. वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. विश्वास संस्थेने शक्कल लढवत सर्व नगरसेविकांना फेटे बांधत त्यांना मानाचा मुजरा केला. कार्यक्रमाचा दिमाख वाढवला. माया कदम यांच्या गीताने कार्यक्रमाची संगीतमय सुरूवात झाली. कमल चौधरी, स्नेहा आम्रे, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, कविता पाटील, अर्चना मणेरा, दीपा गावंड, प्रतिभा मढवी, आशादेवी सिंग, नंदा पाटील या भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला यावेळी पोचपावती देण्यात आली. ‘लोकमत सखी मंच’तर्फे त्यांना यावेळी मानपत्र व भेटवस्तू देण्यात आली. ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक राघवेंद्र शेट, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले, संस्थेच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनिता वाघुले, स्थायीच्या माजी सभापती सुनंदा दाते यांच्या हस्ते या नगरसेविकांचा सत्कार करून त्यांच्या कर्तृत्त्वाला मन:पूर्वक सलाम केला. महिलांसाठी भविष्यात अनेक उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली. ‘लोकमत’सारखे वृत्तपत्र आणि सखी मंच उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी ही सोबत यापुढेही कायम असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्कारमूर्ती नगरसेविकांच्या वतीने मृणाल पेंडसे यांनी महिलांना व्यक्त होण्याचे आवाहन करीत आपले मनोगत व्यक्त केले.निवडून आलेल्या नगरसेविकांचे अभिनंदन करीत ज्येष्ठ नेत्या सुनंदा दाते यांनी कामे कशी करून घ्यावी आणि कोणत्या उपक्रमांना प्राधान्य द्यावे, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून घेणे कसे गरजेचे आहे, याबद्दल कानमंत्र दिला. (प्रतिनिधी)विश्वास संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे महिला दिनानिमित्त भोंडला, मंगळागौर, विविध क्षेत्रांतील महिलांचे सत्कार, आरोग्य शिबिर, रांगोळी व मेहंदी स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार कसा मिळेल, यासाठी देखील प्रयत्न केले जातात. ‘सखी मंच’सोबत महिला नगरसेविकांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात विशेष आनंद मिळाला.- संजय वाघुले, अध्यक्ष, विश्वास सामाजिक संस्था केवळ जागतिक महिला दिनानिमित्त नव्हे, तर इतर वेळीही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले पाहिजेत. त्यातून त्यांचा हुरूप वाढेल. - कमल चौधरी, नगरसेविका.‘लोकमत’ नेहमीच महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवित असतो. आताही आमच्या कार्याचा गौरव झाला, त्याबद्दल आम्ही आयोजकांचे आभारी आहोत. - नम्रता कोळी, नगरसेविका. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर नेहमीच महिलांचे प्रश्न मांडले जातात. मी नगरसेविका म्हणून केवळ माझ्या प्रभागातील नव्हे, तर शहरातील सर्वच महिलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीन.- दीपा गावंड, नगरसेविका.महिला दिनानिमित्त ‘विश्वास सामाजिक संस्था’ आणि ‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित केलेला कार्यक्रम हा प्रोत्साहन देणारा होता. याचपद्धतीने प्रत्येक पुरूषाने स्त्रियांची मते जाणून घ्यावीत, त्यांना प्रोत्साहन द्यावे. - प्रतिभा मढवी, नगरसेविका.‘लोकमत’ महिलांचे प्रश्न जाणून घेत आहे, ते पाहून आनंद वाटला. शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी, अन्य उपक्रमांसाठी भविष्यात ‘लोकमत’ सोबत आणखी उपक्रम राबविण्याचा मानस आहे.- स्नेहा आम्रे, नगरसेविका.मी स्वत: सखी मंचची सभासद आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा घरचा कार्यक्रम होता. महिलांसाठी आणखीही नाविन्यपूर्ण कार्यक्रम व्हायला हवेत. मी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. त्यामुळे महिलांसाठी खूप काही करण्याचा मानस आहे. - कविता पाटील, नगरसेविका.कार्यक्रम खूप छान होता. या निमित्ताने नवनिर्वाचित नगरसेविकांना बोलविल्याबद्दल, त्यांचा गौरव करून प्रोत्साहन दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. - मृणाल पेंडसे, नगरसेविका. ‘विश्वास सामाजिक संस्था’ आणि ‘लोकमत सखी मंच’तर्फे माझा सत्कार झाला. कौतुक झाले. उभारी मिळाली. त्याबद्दल खूप छान वाटते आहे. - आशादेवी सिंग, नगरसेविका.निवडून आल्यानंतर केलेल्या गौरवाचा हा कार्यक्रम उत्कृष्ट झाला. प्रेक्षकांमधील महिलांनीही कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.- अर्चना मणेरा, नगरसेविका. ‘लोकमत’ने यापुढेही हा पायंडा जपत महिलांसाठी असेच विशेष कार्यक्रम राबवावे. त्यातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यांचे नेतृत्व बहरेल.- नंदा पाटील, नगरसेविका.
सलाम, ‘ती’च्या कर्तृत्त्वाला सलाम!
By admin | Updated: March 9, 2017 03:14 IST