अंबरनाथ : अंबरनाथमध्ये दोन दिवस झालेल्या कोकण चषक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अंतिम सामना चांगलाच रंगला. खुल्या गटातील स्पर्धेत ठाण्याचा हरेश कराळे आणि रायगडचा अंकुश घरत यांच्यात सामना रंगला. अटीतटीच्या सामन्यात विजेतेपद कराळे याने मिळवले. तर, महिलांच्या गटातील विजेतेपदाचा मान ठाण्याची अश्विनी मढवी हिला मिळाला. तिने अंबरनाथच्या पूजा शिर्केचा पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बांधकाम सभापती सदाशिव पाटील आणि नगरसेवक सचिन पाटील यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने अंबरनाथवासीयांसाठी गावदेवी मैदानात सामने भरवले होते. महिला गटातून ठाण्याची अश्विनी मढवी व कुमार गटातून ठाण्याचे भूषण राऊत आणि प्रौढ गटातून हरेश कराळे प्रथम आले. महिलांच्या सामन्यात ४० ते ५० वजनी गटात कोमल देसाई आणि शालिनी म्हात्रे या अनुक्रमे विजेत्या आणि उपविजेत्या ठरल्या. ५१ ते ६० वजनी गटात कल्याणची भाग्यश्री भोईर आणि कल्याणची ममता राठोड अनुक्रमे विजेत्या आणि उपविजेत्या ठरल्या. ६१ ते ७० वजनी गटात ठाण्याची अश्विनी मढवी आणि पूजा शिर्के यांच्यात सामना रंगला.कुमार गटात ४० ते ५० किलो वजनी गटात ठाण्याचा भावेश जाधव आणि कल्याणचा जितेंद्र मढवी हे अनुक्रमे विजेते आणि उपविजेते ठरले. ५१ ते ६० किलो वजनी गटात ठाण्याचा करण भंडारी आणि ठाण्याचाच मनीष भोईर हे अनुक्रमे विजेते आणि उपविजेते ठरले. ६१ ते ७० किलो वजनी गटात भूषण राऊत आणि अनिकेत मढवी हे विजेते आणि उपविजेते ठरले. प्रौढ गटात ६१ किलो वजनी गटात ठाण्याचा अजय भोईर आणि कल्याणचा साहिल म्हात्रे यांनी विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळवले. ६५ किलो वजनी गटात लखन म्हात्रे आणि किरण ढवळे यांनी विजेते आणि उपविजेतेपद पटकावले. ७० वजनी गटात जयेश साळवी आणिभावेश चौधरी विजेते आणि उपविजेतेपद पटकावले. (प्रतिनिधी)
हरेश, अश्विनी ठरले कोकण चषकाचे मानकरी
By admin | Updated: March 24, 2017 01:06 IST