डोंबिवली : पूर्वेतील नेहरू रोडवरील दुकानदारांनी विविध कारणांसाठी पदपथाला लागूनच रस्त्यावर उभारलेल्या बेकायदा पायऱ्यांवर केडीएमसीने गुरुवारी रात्री हातोडा चालवला. यामुळे दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली.फडके रोडवरील दुकानदारांनी पदपथ, तर फेरीवाल्यांनी रस्ते बळकावल्याने भाजपाच्या नगरसेविका खुशबू चौधरी, नगरसेवक राजन आभाळे, विश्वदीप पवार यांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेतली. गुरुवारी रात्रीही त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरून महापालिकेने अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी केली. या वेळी त्यांनी फडके रोडनंतर नेहरू रोडकडे मोर्चा वळवला. महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी कारवाईकडे कानाडोळा होत असल्याची टीका चौधरी यांनी केली. ग्राहकांना दुकानात सहज प्रवेश करता यावा तसेच दुकानासमोरील पार्किंग टाळण्यासाठी काही दुकानदारांनी पदपथाला लागूनच रस्त्यांवर पायऱ्या तयार केल्या आहेत. त्या बेकायदा आहेत. त्याकडे महापालिकेचे लक्ष का नाही, रस्ता आणि पदपथ मोकळे असायलाच हवेत. दुकानदारांनी दुकानांव्यतिरिक्त एक इंचही जागा वापरू नये. त्यामुळे पदपथावरील अतिक्रमणे हटवा, बेकायदा पायऱ्या तोडा, अन्यथा पथकातील कर्मचाऱ्यांनी घरी जाऊ नये, असा आग्रह धरला. अखेर, महापालिका कर्मचाऱ्यांनी पायऱ्यांवर कारवाई केली. (प्रतिनिधी)भूमिका स्पष्ट करा दुकानांसमोरील पायऱ्यांवर नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने व्यापाऱ्यांनीही चर्चेने समस्या सुटेल, अशी मवाळ भूमिका घेतली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदाच काय ती भूमिका स्पष्ट करावी, वेळोवेळी धोरण बदलू नका, असे बोल त्यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांना सुनावले.
बेकायदा पायऱ्यांवर हातोडा
By admin | Updated: April 1, 2017 05:32 IST