डोंबिवली : केडीएमसीने साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी सहकार्य करूनही आयोजकांनी एका राजकीय पक्षाचे ऐकून संमेलनाच्या पत्रिकेत महापालिकेचा लोगो, पदाधिकारी, आयुक्त, महापौर व महापालिकेचा उल्लेख करण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही. आयोजकांच्या या कृतीमुळे संमेलन भाजपाने हायजॅक केले आहे, असा आरोप महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला आहे. महापालिकेने संमेलनासाठी क्रीडासंकुल, नाट्यगृह, बससेवा मोफत दिली आहे. तसेच ५० लाखांचा निधीही दिला आहे. असे असतानाही संमेलनाच्या पत्रिकेत अनुल्लेखाने आमच्या सौजन्याचा अपमान केला आहे. आयोजकांनी कार्यक्रम पत्रिका पुन्हा छापावी. त्यांना नगरसेवकांकडून निधीची अपेक्षा आहे. अशी वागणूक दिल्यास ती कशाच्या आधारे आणि का पूर्ण करावी, असा सवाल महापौरांनी केला. भाजपाच्या नेत्याचे ऐकून आम्हाला डावलणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा नामोल्लेख न करता केला. भाजपाने साहित्य संमेलन हायजॅक केले आहे. मग भाजपाकडून १० कोटींचा निधी मिळवून संमेलन करावे. आमची मदत का घेतली, असा सवाल करत महापौरांनी आयोजकांच्या कृतीचा निषेध केला. (प्रतिनिधी)
‘भाजपाकडून संमेलन हायजॅक’
By admin | Updated: January 25, 2017 04:43 IST