ठाणे : ठाण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंटच्या मित्राचा ई-मेल हॅक करून एक लाख ८६ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. राबोडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंटच्या मित्राचा मोबाइल फोन काही दिवसांपूर्वी चोरी गेला. हा मोबाइल एका अज्ञात हॅकरने तपासला. त्यामध्ये तक्रारदार चार्टर्ड अकाउंटंटसोबत मित्राने व्हॉट्सअॅपवर केलेले चॅटिंगही हॅकरला दिसले. त्यावरून दोघांमधील व्यवहार हॅकरला समजले. त्याने चार्टर्ड अकाउंटंटच्या मित्राच्या नंबरचे ड्युप्लिकेट सीमकार्ड घेऊन त्यांचा ई-मेलही हॅक केला. त्याआधारे त्याने चार्टर्ड अकाउंटंटशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. फिरोज अख्तर नावाच्या एका मित्राच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात एक लाख ८६ हजार रुपये जमा करण्याची विनंती त्याने चार्टर्ड अकाउंटंटला केली. चार्टर्ड अकाउंटंटला त्यांच्या मित्राचा मोबाइल चोरी गेल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या जवळच्याच मित्राने हे काम सांगितले असल्याचे समजून रक्कम जमा केली. काही दिवसांनी त्यांच्या मित्राची भेट झाली, तेव्हा त्यांनी मोबाइल फोन चोरीस गेल्याचे सांगितले.त्यानंतर, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. संबंधित चार्टर्ड अकाउंटंटने शनिवारी या प्रकरणाची राबोडी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे करत आहेत.
ई-मेल हॅक करून १.८६ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 06:15 IST