आसनगाव : ग्रामपंचायतीच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये खर्चाचा हिशेब मुदतीत सादर न करणाऱ्या तसेच मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांवर सध्या सदस्यपदे रद्द होण्याची टांगती तलवार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.शहापूर तालुक्यातील शेंद्रुण ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेले संतोष काळुराम मुकणे व अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या विनता संतोष मुकणे या दोघा सदस्यांनी निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चाचा हिशेब दिलेला नाही. लोनाड ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर निवडून आलेले हरी अर्जुन हिलम यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादरच केलेले नाही. तर, अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या प्रतीक्षा प्रकाश मेंगाळ यांनी जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या संगीता गजानन भोईर यांनीही जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. वेहळोली ग्रा.पं.मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या भारती अशोक वेखंडे, अनुसूचित जातीसाठीच्या गटातून निवडून आलेले बंधू गंगाराम जाधव व अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या मुक्ता अरु ण पवार या तिन्ही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. (वार्ताहर)
ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांवर आयोगाची टांगती तलवार
By admin | Updated: February 14, 2017 02:51 IST