कल्याण : वसई-विरार महापालिकेतील विद्यमान अतिरिक्त आयुक्त आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी आयुक्त गोविंद राठोड यांना सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच नगरविकास खात्याने सोमवारी तडकाफडकी निलंबित केले आहे. या वृत्ताला नगरविकास सचिव मनीषा म्हैैसकर यांनीही दुजोरा दिला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत आयुक्त असताना बीओटी प्रकल्पासंदर्भात आरोप झाल्यानंतर शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नांगनुरे समिती नेमली होती. या समितीनेही त्यांच्यावर ठपका ठेवला होता; तर विद्यमान आमदार नरेंद्र पवार हे नगरसेवक असताना त्यांनी राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून न्यायालयात धाव घेतली होती. ही पार्श्वभूमी त्यांच्या निलंबनामागे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ते निवृत्त होणार म्हणून त्यांच्या निरोपासाठी वसई महापालिकेत मंगळवारी विशेष समारंभ आयोजित केला होता. परंतु निलंबन होताच ते कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)
गोविंद राठोड तडकाफडकी निलंबित
By admin | Updated: December 2, 2015 00:22 IST