लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपल्याकडे चिंतनात्मक, आस्वादक पुस्तके प्रकाशित होतात. पण ती आपल्यापेक्षा परदेशात अधिक वाचली जातात. तिथे त्यांना अधिक मागणी आहे. कारण तिथे काय वाचाव? याचं मार्गदर्शन करणारी पुस्तकही तिथे आहेत. त्यामुळे गोंधळ न उडता लोकं वाचन करतात. मात्र आपल्याकडे लोकं ट्रेनमध्ये वाचतात किंवा रात्री झोप येत नाही म्हणून वाचतात. पण असं न करता एखादं चिंतनात्मक पुस्तक वाचलं तर त्यातून आपल्याच विचारांना चालना मिळेल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ लेखक अरविंद दोडे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ लेखक रामदास खरे यांच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह करून त्याचे ‘...आणि ग्रंथोपजीविये १’ हे पुस्तक तयार केले आहे. खरे यांच्या या पहिल्या ई-पुस्तकाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा बुधवारी ठाण्यात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना ते बोलत होते. एका संशोधनानुसार माणूस हा आपल्या बुद्धीचा खूप कमी वापर करतो. मात्र त्याने तो अधिक केला पाहिजे आणि तो अधिक करायचा असेल तर चिंतनात्मक, वैचारिक पुस्तके वाचणं फार आवश्यक आहेत. ती पुस्तके जगायचं कसं शिकवतात, खरे यांच हे पुस्तकही असंच आहे. अतिशय अभ्यासपूर्णरितीने लिहिलेल्या या पुस्तकातील प्रत्येक लेख दर्जेदार आहे. आस्वादक समीक्षा कशी असावी याचं उत्तम उदाहरण असलेलं हे पुस्तक आहे, अशा शब्दात दोडे यांनी खरे यांचे कौतुक केले. तर ‘लोकमत’सारखं घरोघरी पोहोचलेले प्रसिद्ध वृत्तपत्र आणि त्याचे संपादक यांनी वेळोवेळी खरेंना दिलेली संधी आणि प्रोत्साहनशिवाय हे पुस्तक आकार घेणे शक्य नव्हते, असेही दोडे म्हणाले. तर या सध्याच्या परिस्थितीत काळाबरोबर चालायंच असेल आणि या पुस्तकातील विचारांचा गंध जगभरात कुठेही पसरवायचा असेल तर हे पुस्तक ई-बुक स्वरूपात प्रकाशित करायचं मी ठरवलं. हा पहिला भाग असून याचे अजून ३ भाग लवकरच प्रकाशित होणार आहेत, असे खरे यांनी मनोगतात सांगितले. याप्रसंगी अस्मिता येंडे, वृषाली शिंदे, ई-साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत, सुजाता राऊत आदी उपस्थित होते.