डोंबिवली : पूर्वेतील पी अॅण्ड टी कॉलनीतील विविध सोसायट्यांमध्ये पाणीसमस्या जाणवत आहे. त्यामुळे तेथील रहिवासी त्रस्त आहेत. जोपर्यंत ही समस्या कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत गंगा सोसायटीतील रहिवाशांना महापालिकेतर्फे सवलतीच्या दरात पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावा. त्यावर, तातडीने तोडगा काढावा, असे पत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहे.शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, त्या परिसरातील नागरिक पक्षाच्या मध्यवर्ती शाखेत येऊन तक्रारी देत आहेत. रहिवाशांना ११०० रुपये देऊन पाण्याचा टँकर घेणे परवडत नाही. महापालिका हद्दीत ते राहत असूनही त्यांच्यावर ही वेळ आल्याने ते त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेमार्फत त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यापूर्वी आपण त्यांना अनेकदा महापालिकेचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, पाण्याची नेमकी समस्या कुठे आहे, याचा एका प्लम्बरमार्फत शोध घ्यावा, असे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गंगा सोसायटीला सवलतीत टँकर द्या
By admin | Updated: March 24, 2017 01:05 IST