वसई : अपंगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीचा पुरेपूर वापर करण्याचे आणि त्यांना नोकर भरतीत प्राधान्याने सामावून घेण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात अंध व मतिमंदांसाठी डे केअर सेंटर सुुरु करण्यात येणार असल्याची माहिती ही दिली. वसई विरार महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून अपंगांसाठी राखीव असलेला निधी वापरला नसल्याचे आणि निधीचा विनियोग दुसऱ्याच कामासाठी केल्याचे व गेल्या वर्षभरात अवघ्या दोन हजार अपंग व्यक्तींची नोंद केल्याचे उजेडात आले आहे. वसई पंचायत समितीनेही गेल्या पाच वर्षात अपंगांसाठी असलेल्या राखीव निधीचा वापर केलेला नाही. याप्रकरणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास केंगार, उपाध्यक्ष रवींद्र सोनावणे, सचिव चंपक शाह यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित बांगर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन तक्रार केली होती. तिची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना अपंगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीचा विनियोग योग्य रितीने करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपंगांसाठी राखीव असलेल्या जागांवर त्वरीत भरती करण्याचे निर्देशही दिले. (प्रतिनिधी)
अपंगांना राखीव नोकऱ्या द्या!
By admin | Updated: February 9, 2017 03:41 IST