- राजू काळे, भाईदर
पश्चिमेकडील मीरा-भार्इंदर पालिका अग्निशमन केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरण दोन महिन्यांपासून रेंगाळल्याने केंद्राचे स्थलांतर नव्या जागेत केले. मात्र तेथे सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १३ एप्रिलच्या अंकात ‘अग्निशमन नव्हे, हे तर जणू समस्यांचेच केंद्र’या शिर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार उपायुक्त दीपक पुजारी यांनी केंद्र पुन्हा जुन्या जागेतच सुरू केले. भार्इंदर पश्चिमेकडील ६० फुटी मार्गावर नगरपालिकेच्या काळात एकमेव अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले होते. कालांतराने तेच अग्निशमन केंद्र मुख्य केंद्र बनले. सध्या ते मुख्य शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ते महत्वाचे मानले जाऊ लागले. यानंतर शहराच्या विस्ताराप्रमाणे पालिकेने आणखी दोन केंद्र सुरू केली. पालिकेने जुन्या केंद्राजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केले. त्यावेळी केंद्रातील बंब बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा सोडून इतर ठिकाणी काँक्रिटीकरण करणे आवश्यक होते. परंतु, कंत्राटदाराने पुरेशी जागा न सोडताच सरसकट सर्वच रस्ता खोदला. त्यामुळे केंद्रातील वाहने बाहेर पडण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने सुविधांचा अभाव असलेल्या नवीन केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले. केंद्र स्थलांतरीत केल्यानंतरही प्रत्यक्षात कारभार मात्र जुन्याच केंद्रातून हाकला जात होता. नवीन केंद्रात पिण्याच्या पाण्याची, दूरध्वनीची सोय नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे अत्यंत जिकरीचे जात होते. जवनांनाही घटनास्थळी जाण्यास विलंब होत होता. कंत्राटदाराचे हित जोपासले केंद्र स्थलांतराच्यावेळी पालिकेने नियोजन करणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. तसेच केंद्रातील वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेसा रस्ता उपलब्ध करुन देणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ कंत्राटदाराचे हित जोपासण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.