लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गावदेवी परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या उपायुक्तांवर हल्ला झाल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. एकीकडे फेरीवाल्यांवरील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला असताना दुसरीकडे मात्र उपायुक्तांवरील हल्ला हा फेरीवाल्यांनी केला नसल्याचा आरोप त्यांच्या संघटनांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी सामने येईल, असा दावाही संघटनेने केला असून आयुक्तांच्या या हुकूमशाहीविरोधात थेट न्यायालयात जाणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.बुधवारी संध्याकाळी गावदेवी परिसरात कारवाई करायला गेलेले महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून जबर मारहाण झाल्यानंतर याची गंभीर दखल पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनेच माळवी यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला असून तो पालिका प्रशासनावरच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी येथील दुकानदारांना कोणतीही नोटीस व पूर्वसूचना न देता पालिकेने २७ दुकानांवर बेछूट हातोडा टाकला. परंतु, ही कारवाई पूर्वनियोजित नसल्याचा मुद्दा फेरीवाला संघटनेने उपस्थित केला आहे. ज्या वेळेस हा हल्ला झाला, त्या वेळेस कोणी कोणाला मारले, हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासा, म्हणजे सर्व लक्षात येईल, अशी मागणी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष दीपक घनश्यामी यांनी केली आहे. उलटपक्षी उपायुक्तच दुकानदाराला मारहाण करत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यात त्यांना जी मारहाण झाली, ती फेरीवाल्यांकडून नसून येथील सर्वसामान्य माणूस संतप्त झाला आणि त्यांनीच ती केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
कारवाईविरोधात फेरीवाले आक्रमक
By admin | Updated: May 13, 2017 00:51 IST