उल्हासनगर : शिवसेना उमेदवारासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या बंडखोरांच्या दोन दिवसांत हकालपट्टीचे संकेत शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या आक्रमक धोरणामुळे बंडखोरांत खळबळ उडाली असली, तरी निवडणुकीत बंडखोरांमुळे शिवसेनेला काही जागांवर नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.उल्हासनगर शिवसेना गटातटांत विभागली असून घराणेशाही निर्माण झाल्याची टीका होत आहे. प्रस्थापितांना व घराणेशाहीला पक्षाच्या तिकिटांचे वाटप झाल्याचा आरोप करून बंडखोरांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. इतर पक्षांच्या तिकिटावर ते निवडणूक रिंगणात उतरले असून पक्षाच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले. वरिष्ठांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला असून दोन दिवसांत त्यांच्या हकालपट्टीचे संकेत चौधरी यांनी दिले आहेत. प्रभाग क्र.-१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस नगरसेविका मीना सोंडे, अपक्ष नगरसेवक विजय पाटील, माजी नगरसेवक किशोर वनवारी यांना पक्षात प्रवेश देऊन तिकिटाचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी पक्षाला काही तासांत सोडचिठ्ठी देऊन भाजपाच्या तिकिटावर रिंगणात ते उतरले आहेत. शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर, माजी महापौर यशस्विनी नाईक, माजी महापौर विद्या निर्मले, नरेश साळवे, नितीन बोबडे, नगरसेवक जयेंद्र मोरे, उपविभागप्रमुख रवींद्र महाजन आदींनीही बंडखोरी करून इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचे हे बंड मोडीत काढून पालिकेवर भगवा फडकावणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिवसेना बंडखोरांची दोन दिवसांत होणार हकालपट्टी
By admin | Updated: February 12, 2017 03:34 IST