मीरा राेड : मीरा भाईंदरमधील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळात फेरीवाले व हातगाडीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. नाफेरीवाला क्षेत्रात तर सर्रास फेरीवाले बसत आहेतच, शिवाय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत रेल्वेस्थानक, रुग्णालय, धार्मिक स्थळ व शौक्षणिक संकुलालादेखील फेरीवाल्यांचा गराडा पडल्याने महापालिकेच्या डोळेझाक भूमिकेबद्दल नागरिक संतप्त आहेत.न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटर, तर शैक्षणिक संकुल, रुग्णालय व धार्मिक स्थळांपासून १०० मीटरपर्यंतच्या परिसरात हातगाड्या, फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केलेली आहे. याशिवाय महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर ना फेरीवाला क्षेत्राचे फलक लावलेले आहेत. फेरीवाल्याना बसण्यास परवानगी आहे, त्याठिकाणी पालिकेने पट्टा आखून दिलेला आहे. तरीही शहरातील भाईंदर व मीरारोड रेल्वेस्थानकाच्या १५० मीटर परिक्षेत्रात तसेच शैक्षणिक संकुल, रुग्णालय व धार्मिक स्थळांपासून १०० मीटरपर्यंतच्या परिसरात राजरोसपणे हातगाड्या व फेरीवाल्यानी बस्तान मांडलेले आहे. रेल्वे स्थानक परिसरात ये-जा करण्यासाठी प्रवाशांना फेरीवाल्यांच्या आणि वाहतूककोंडीच्या गराड्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनले आहे. रुग्णालय, धार्मिक स्थळ परिसरातसुद्धा फेरीवाले सर्रास बसत आहेत.महापालिकेने मोठा गाजावाजा करत मंडई सुरू केल्या, पण मंडईमध्ये कोणाला समाविष्ट केले यावरून आरोप सुरू असतानाच मंडई परिसरातदेखील फेरीवाले व हातगाड्या यांनी रस्ते-पदपथ गिळंकृत केले आहेत. पालिकेने ना फेरीवाला क्षेत्राचे फलक शहरातील मुख्य रस्त्यांवर लावले असले, तरी त्या फलकांखालीच हातगाड्या, फेरीवाल्यांनी पालिका आणि नगरसेवकांच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण केले आहे.वाढती वाहतूक व नागरिकांची वर्दळ यामुळे रस्ता-पदपथ आणि नाके आधीच अपुरे पडत असताना दुसरीकडे फेरीवाले, बाकडेवाले आदींनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे रस्ते, पदपथावरून चालणे, वाहन नेणे जिकरीचे झाले आहे. रस्ते, पदपथ फेरीवाल्यांची व्यापल्याने दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका जाणेदेखील अवघड झाले आहे. रस्ते, पदपथावरील हातगाड्या व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे भांडणे, मारामारी, मुली-महिलांची छेडखानी, पाकीटमारी यांसारखे प्रकार वाढले असल्याचे आरोप होत आहेत.
मी सतत महापालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. कारवाई होते; पण पालिकेचे पथक गेले की फेरीवाले परत येऊन बसतात. त्यासाठी कर्मचारी वाढवून देण्याची तसेच ज्वलनशील पदार्थ वापर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. न्यायालयात ज्यांचा वाद सुरू आहे त्या फेरीवाल्यांची बैठक घेऊन रस्ते - पदपथ मोकळे ठेवून सहकार्य करण्याच्या सूचना केल्या होत्या. - हेतल परमार, सभापती, मीरा रोड
शहरातील रस्ते - पदपथ हे नागरिकांसाठी शिल्लक राहिलेले नसून ते बेकायदा हातगाड्या, फेरीवाल्यांना महापालिका, नगरसेवक व सत्ताधारी भाजपने विकून खाल्ले आहे, असेच म्हणावे लागेल. कारण जेवढे जास्त फेरीवाले तेवढा फायदा बाजार वसुली ठेकेदाराला आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या नगरसेवक - प्रशासन यांचा आहे का? मनसेने कारवाईसाठी तक्रारी केल्या असून आंदोलन करू. - हेमंत सावंत, शहरध्यक्ष, मनसे
महापालिकेकडून रस्त्यावरील हातगाड्या - फेरीवाले यांच्यावर नियमितपणे कारवाई सुरू आहे. या कारवाईसाठी महापालिकेने ठिकठिकाणी सहा पथके नेमलेली आहेत. या फेरीवाल्यांविरोधात नगरसेवक, तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारी येताच संबंधितांना सूचना देऊन कारवाई केली जात आहे. - नरेंद्र चव्हाण विभागप्रमुख , अतिक्रमण