ठाणे : ठाणे शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक या संवर्गांतील इमारती खाली न झाल्यास त्यासाठी सहायक आयुक्तांना व्यक्तिश: जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. तसेच येणाऱ्या मान्सूनच्या काळात आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज करतानाच जे अधिकारी या काळात आपले मोबाइल बंद ठेवतील, त्यांच्यावर कारवाईचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. येत्या ७ जूनपर्यंत १०० टक्के नालेसफाई झालीच पाहिजे, असे आदेशही त्यांनी संबंधित विभागास दिले आहेत. शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने मान्सूनपूर्व समन्वय बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही केल्या. शहरातील नालेसफाईचे काम कोणत्याही परिस्थितीत ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच सर्व सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंत्यांनी नालेसफाईच्या कामाची नियमित पाहणी करावी तसेच नालेसफाई करतानाच रस्त्याच्या बाजूच्या गटारांचीही सफाई व्यवस्थितपणे होत असल्याबाबत खात्री करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.दरम्यान, धोकादायक, अतिधोकादायक इमारतींच्या कारवाईबाबत धोरण स्पष्ट करताना आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीस्तरांवरील सर्व इमारती खाली करण्याची कारवाई करावी. ३१ मे अखेरपर्यंत अशा इमारती खाली झाल्या नाहीत, तर त्याबाबतीत सर्व सहायक आयुक्तांना व्यक्तिश: जबाबदार धरून इमारत खाली न केल्यामुळे जर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी एक व्यक्ती संपर्क यादी तयार करण्याच्या सूचना देऊन यामध्ये होणारी पुनरावृत्ती टाळून मदतकार्य प्रभावीपणे करण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे सांगून पावसाळ्यात आवश्यक ती सर्व साधनसामग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.
‘त्या’ इमारती रिकाम्या करा
By admin | Updated: May 22, 2016 01:29 IST