लोकमत न्युज नेटवर्कभिवंडी : अर्ज भरण्याची मुदत उलटून चोवीस तास गेल्यावरही भिवंडी पालिका निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी तयार नसल्याचा अनुभव रविवारी आला. निवडणूक निर्णय कार्यालयाने उमेदवारांची यादी न दिल्याचा आरोप पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला. आॅनलाइन अर्ज स्वीकारूनही वेगवेगळ््या कार्यालयांकडून ही न मिळाल्याने निवडणूक विभागाची यंत्रणा सपशेल कोलमडल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे यावेळीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांच्या यादीबाबत माहिती विचारली असता एका निवडणूक अधिकाऱ्यांने काल रात्री त्यांना फौजदारी केस करण्याची धमकी दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. पालिकेचे कर्मचारी या यादीवर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काम करीत असतानाही त्यांना माहिती पुरवली जात नव्हती. रविवारी दुपारी चारपर्यंत पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाने आठ कार्यालयांपैकी तीन कार्यालयांतील उमेदवारांची यादी पत्रकारांना पुरवली. याबाबत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त योगेश म्हसे यांनी केलेली व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे अनुभवास आले. या गोंधळामुले नेमके किती जणांनी अर्ज भरले, याबाबतचा घोळ कायम होता. अखेर ६२९ जणांनी अर्ज भरल्याचे सांगण्यात आले. एक खिडकी योजनेतील अधिकाऱ्यांची अरेरावी आणि कागदपत्रे सादर करण्यातील घोळामुळे अनेकांना अर्ज भरता न आल्याचा आरोपही उमेदवारांनी केला. या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. नंतर या खिडकीजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण तेथील कर्मचाऱ्यांच्या बेताल वागण्याने कार्यकर्त्यांचे अनेकवेळा वाद झाले.निवडणूक कार्यालयांत दाखल झालेल्या अर्जाबाबतच्या माहितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, शिवसेना, भाजपा, कोणार्क विकास आघाडी, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्ट, एमआयएम, आरपीआय (आठवले), आरपीआय (सेक्युलर), आरपीआय (एकतावादी), संभाजी ब्रिगेड यांच्या उमेदवारांसह मोठ्या संख्येने अपक्षांनी अर्ज भरले आहेत. पक्षाकडून निधी न मिळाल्याने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी या वेळी निवडणुकीत उडी घेतली नाही, गायत्रीनगरच्या पॅनेलमध्ये चारही उमेदवार कोणार्क विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याने भाजपाने उमेदवार दिले नव्हते. मात्र त्यातील आरपीआय एकतावादीच्या उमेदवारांनी चिन्हाचा वाद झाल्याने आपल्याच पक्षाच्या निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने कोणार्कला धक्का बसला. मात्र, शिवसेनेसह इतर पक्षांनी मात्र उमेदवार उभे केले आहेत. बहुतेकांनी दृष्टीकोनातून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक पक्षाच्या चिन्हावर आणि दुसरा अपक्ष म्हणून भरला आहे. आमदार महेश चौघुले यांच्या पत्नी मेघना यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
भिवंडीमध्ये निवडणूक यंत्रणा कोलमडलेलीच
By admin | Updated: May 9, 2017 00:17 IST