भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका महापौर चषक स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. त्याचे उद्घाटन महापौर गीता जैन यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे औचित्य साधून महापालिकेतर्फे सूर्यकुंभ झाला. यासाठी आठ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सोलर कुकरवर नूडल्स शिजवून खाल्ले. या सौरकुंभात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाल्याने त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात येणार असल्याचे क्रीडा अधिकारी दीपाली पोवार यांनी सांगितले. उपमहापौर प्रवीण पाटील, आयुक्त सतीश लोखंडे, ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर, उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, डॉ. संभाजी पानपट्टे, दीपक पुजारी, शेफ हरपाल सिंग, जालन्याचे ऊर्जातज्ज्ञ विवेक काब्रा उपस्थित होते. काकोडकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना सौर या अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करून या ऊर्जेबाबत जनजागृती करण्याचा सल्ला दिला. पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जेचा खर्च परवडणारा असल्याने ती सूर्याच्या किरणांद्वारे मिळते. भविष्यात सौरऊर्जेचा वापर वाढणार असून त्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. महापौर गीता जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. सौरकुंभासाठी प्रत्येकी २० विद्यार्थ्यांमागे एक अशा प्रकारे ५०० स्वयंसेवक, २७५ पर्यवेक्षक एसएन महाविद्यालयाच्या सहकार्याने तैनात केले होते. प्रत्यक्षात आठ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित झाले असले तरी प्रत्यक्षात केवळ ७ हजार २०० विद्यार्थ्यांनाच सोलर कुकर देण्यात आले. यासाठी उत्तन येथील केशवसृष्टीच्या तज्ज्ञांंचे मार्गदर्शन घेण्यात आले. तांत्रिक सल्ल्यासाठी सिम्प्लिफाय टेक्नॉलॉजी या कंपनीची नियुक्ती केली होती. (प्रतिनिधी)
सूर्यकुंभात आठ हजार विद्यार्थी सहभागी
By admin | Updated: February 13, 2017 04:39 IST