ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असतांनाही आघाडीचे घोडे आठ जागांवरुन अडले आहे. काँंग्रेसने या जागांवर केलेला दावा राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे मंगळवारी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्याशी मुंबईत जाऊन चर्चा केली. आता राणे बुधवारी यावर ठाण्यात येऊन तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी राणे काँग्रेसमधील इच्छुकांशी वन टू वन चर्चा करणार आहेत.ठामपा सार्वत्रिक निवडणूक लागल्यापासून आघाडीबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरुच आहे. एकीकडे कॉंग्रेसचे नेते राणे यांनी मुंबईत आघाडी झाल्याची घोषणा केली असतांना दुसरीकडे कॉंग्रेसचे स्थानिक नेते राष्ट्रवादीकडील आठ जागांवर आजही ठाम आहेत. परंतु राष्ट्रवादी देखील या जागा सोडण्यास तयार नाही. या आठ जागांमध्ये मुंब्रा,गोकूळनगर , घोडबंदर , वागळे , बाळकुम आदींचा समावेश आहे. मंगळवारी कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे आणि बाळकृष्ण पूर्णेकर आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी हा तिढा सोडविण्यासाठी थेट राणे यांची भेट घेतली. राणे हे बुधवारी दुपारी तीन वाजता इच्छुकांशी बोलणार असून त्यानंतर या आठ जागांबाबत निर्णय होणार आहे. (प्रतिनिधी)
आठ जागांचा तिढा सुटणार!
By admin | Updated: January 25, 2017 04:53 IST