लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या असून येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी शिक्षण क्षेत्राने हातभार लावला पाहिजे,’ असे मत मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वायत्त महाविद्यालयांनी करावयाच्या उपाययोजनांवर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालय, ठाणे व रामानंद आर्य डीएव्ही स्वायत्त महाविद्यालय, भांडुप यांच्यातर्फे सात दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप सत्रात कुलकर्णी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानातील मूलगामी संशोधनामुळे सध्या शिकत असलेल्या गोष्टी लवकरच कालबाह्य होतील. अशी परिस्थिती असताना विद्यार्थ्यांना कल्पक व शाश्वत विकासाकडे नेणारे शिक्षण दिले पाहिजे. प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्या विचारांना त्यांनी उजाळा दिला. शाळेत मिळालेले ज्ञान पुढे आपल्या संशोधनाने संवर्धित करून पुढच्या पिढीपर्यंत शिक्षकांनी पोहोचवले पाहिजे.
या वेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी व डॉ. प्रमोद पाबरेकर, जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक व रामानंद आर्य स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय भामरे उपस्थित होते.
--------------------