डोंबिवली : डिसेंबरअखेरपर्यंत श्री मलंगगड येथील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिला. रस्त्यांचे जाळे मजबूत केल्यास मुरबाड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येईल. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मूलभूत सुविधा निर्माण करून मुरबाड परिसर इको टुरिझमच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी वन विभागाशी चर्चा करेल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. श्री मलंगगड येथील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या कामाचा तसेच मुरबाड तालुक्यातील रस्त्यांची कामे याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मंत्रालयात बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग-२, ठाणे येथील कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, उपअभियंता उल्हासनगर सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजेश सोमवंशी, उल्हासनगर सार्वजनिक बांधकाम उपविभाग व्ही.एम. खर्डे, सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मुरबाड ए.एस. बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते. एकूण १०० खांबांवर फ्युनिक्युलर ट्रॉलीचे २ डबे एका फेरीत १२० प्रवाशांची ने-आण करतील. त्यापैकी ८५ खांबांचे काम पूर्ण झाल्याची माहिती कंत्राटदाराने या वेळी दिली. ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होईल.
मिळणार इको टुरिझमचा दर्जा
By admin | Updated: September 3, 2015 23:14 IST