ठाणे : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शनिवार-रविवार या दोन दिवसांच्या कालावधीतील लीपिक, वाहनचालक, शिपाई, परिचारिका, आरोग्यसेवक आदींच्या परीक्षा महाराष्ट्र शासनाने शुक्रवारी रात्री अचानक स्थगित केल्या. यामुळे ठाणे जिल्ह्यातील तब्बल ५४ हजार परीक्षार्थींचा हिरमोड झाला आहे.
जिल्ह्यातील ३० परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्तात या परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. यासाठी ३०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ तैनात केले होते. ‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठी २५ व २६ सप्टेंबर रोजी परीक्षा होत्या. यासाठी राज्यभरात साडेनऊ लाखांहून अधिक परीक्षार्थी होते. त्यात ठाणे जिल्ह्यातील ३० परीक्षा केंद्रांवर ५४ हजार परीक्षार्थींची आसन व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेच्या दृष्टीने काही लांबच्या परीक्षार्थींनी ठाणे शहर परिसर गाठला होता; पण परीक्षा रद्द झाल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. या परीक्षांद्वारे ‘गट क’ संवर्गात दोन हजार ७४० जागा, तर ‘गट ड’ संवर्गात तीन हजार ५०० जागा भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जात होती.
आरोग्य विभागातील ‘गट क’ पदांसाठी शनिवारी परीक्षा होणार होती. त्यासाठी सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान ही परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येणार होती, तर ‘गट ड’साठी रविवारी ही परीक्षा दुपारी १२ ते २ या वेळेत घेतली जाणार होती. या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र अर्ज केलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घेतले होते. काही प्रवेशपत्र ई-मेल व एसएमएसद्वारेही परीक्षार्थींना पाठविले होते. या परीक्षेसाठी २५ दिवस चाललेल्या नोंदणीप्रक्रियेत उमेदवारांना आलेल्या अडचणींचे निराकरण तांत्रिक सहायक चमूच्या मदतीने २४ तासांच्या आत करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.