ठाणे : शहराला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना अधिक प्रमाणात करावा लागला नसला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता उपलब्ध जलस्रोतांमधील पाणी वापरात आणण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात अस्तित्वात असलेल्या विहिरींची सफाई करून त्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, जलशुद्धीकरणाची ही प्रक्रिया बीओटी तत्त्वावर राबवली जाणार असून शुद्ध केलेले पाणी महापालिका संबंधित यंत्रणेकडून विकत घेणार आहे. ठाणे शहराला आजघडीला रोज सुमारे ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या ते मुबलक असतानादेखील मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शहरात पाणीकपात सुरू होती. परंतु, त्याची झळ ठाणेकरांना फारशी सहन करावी लागलेली नाही. असे असले तरी आता उपलब्ध जलस्रोतांकडे पालिकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, शहरात असलेल्या आणि दूषित झालेल्या विहिरींची शोधमोहीम महापालिकेने हाती घेतली होती. त्यानुसार, शहराच्या विविध भागांत ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली. परंतु, यातील काही विहिरी पडीक, वापरात नसणे, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, तर काही कोरड्या पडल्या होत्या. काहींमध्ये गटारांचे पाणी गेल्याने ४० टक्के भूगर्भजलातील पाणीसाठा अशा विविध कारणांमुळे दूषित झाल्याची माहितीही या सर्व्हेत पुढे आली होती. त्यामुळे वापरात नसलेल्या विहिरींची संख्या २१६ वर गेली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ३३९ वर आली आहे. या विहिरींतील पाण्याच्या साठ्याचे मोजमाप ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष लीटर पाणी वापरास व पिण्यास अयोग्य असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत, त्यातील पाणी उपयोगात आणण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, पालिकेने यंदा या विहिरींतील गाळ काढण्याचे काम सुरू करून सुमारे १३० विहिरी स्वच्छ केल्या आहेत.
घोडबंदर, मुंब्रा आणि दिव्याची पाणी वितरण व्यवस्था आणि मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम पालिकेने तत्कालीन केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी या दोन्ही योजनांचा ६५० कोटींचा एकत्रित प्रकल्प अहवाल केंद्राकडे सादर केला होता. मात्र, एवढा निधी देता येत नसल्याचे कारण केंद्राने पुढे केले होते. त्यानंतर, आलेल्या भाजपा सरकारने जेएनएनयूआरएम ही योजनाच बंद केल्याने पालिकेने अहवाल बासनात गुंडाळला होता. परंतु, आता पुन्हा यात काही किरकोळ फेरबदल करून तो तयार केला असून या दोन्ही कामांसाठी सुमारे तेवढाच निधी खर्र्च केला जाणार आहे.सध्या घोडबंदरला ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. परंतु, येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यानुसार, महापालिकेने येथील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचे ठरवले आहे. पाणी वितरण व्यवस्थेच्या कामात जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे, पंपहाउस, पंपिंग मशिनरी, बल्क मीटर बसवणे, आॅटोमेशन आणि स्काडा प्रणाली, स्टाफ क्वॉटर बांधणे, गळती संशोधनाकरिता उपकरणे खरेदी करणे, नळजोडण्या अशी कामे केली जाणार आहेत.