राजू ओढे, ठाणेकुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. छोटा शकीलच्या मदतीने कासकर ठाण्यातील बिल्डर, व्यापारी यांच्याकडून खंडणी वसूल करीत असल्याचे आतापर्यंत तपासात उघड झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी दाऊदला भारतात आणण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे किंवा कसे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तसे असेल तर डॉन को पकडना नामुमकीन है हा डायलॉग बदलेल आणि डॉन को पकडना मुमकीन है... असे म्हणावे लागेल.गुन्हेगारी जगतात प्रचंड दहशत असलेल्या डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीवर हात टाकून खंडणीविरोधी पथकाने दाऊदच्या साम्राज्याला तर हादरा दिला आहेच पण ठाण्यातील खंडणीबहाद्दरांनाही जोरदार धक्का दिला. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या ठाण्यासारख्या शहराने पांघरलेला गुन्हेगारी बुरखा या कारवाईमुळे टराटरा फाटला.साधारणत: २0 वर्षांपूर्वी विकासाच्या उंबरठ्यावर असताना ठाणे शहरात खंडणी बहाद्दरांच्या टोळ्या तयार होऊ लागल्या. मुंबईच्या वेशीवर असलेल्या या शहरात उभे राहत असलेले मोठ-मोठे उद्योग, बहुमजली इमारतींची पायाभरणी खंडणी बहाद्दरांच्या पथ्यावर पडली होती. शहराच्या विकासाबरोबर या टोळ्यांनीही मोठी मजल मारली. पुजारी, मंचेकर यांच्यासारख्या गँगस्टर्सची त्यावेळी मोठी दहशत होती. या काळ्या धंद्यातून गँगस्टर्स आर्थिकदृष्ट्या गबर झाले. काही गँगस्टर्सना राजश्रय मिळाला आणि पांढºया शुभ्र पोषाखामध्ये ते समाजात ताठ मानेने फिरू लागले. त्यांचे पडद्यामागचे जीवन मात्र भयावह होते. पांढ-या पोषाखामागे त्यांच्यात दडलेल्या गुन्हेगारांना ठेचण्याचे काम त्यावेळी भुजंगराव मोहिते आणि सुरेंद्र मोहन शंगारी यांच्यासारख्या पोलीस आयुक्तांनी केले. १५ ते २0 वर्षांपूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता घुले, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आंग्रे यांच्यासारख्या अधिका-यांनी ठाण्यातील खंडणी बहाद्दरांना इतिहासजमा केले. मकोकासारख्या कठोर कायद्यांचा वापर करून या खंडणीबहाद्दरांना वठणीवर आणण्याचे काम ठाण्यातील पोलीस अधिकाºयांनी केले. कठोर कारवाईलाही न जुमानणाºया काही गँगस्टर्सचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला. ठाणे पोलिसांच्या या खाकी झटक्यामुळे खंडणी बहाद्दरांचे जाळे बºयापैकी उद्ध्वस्त झाले. शहराच्या भरभराटीसाठी हे चित्र चांगले होते. मात्र हळूहळू गुन्हेगारी जगतात सर्वांचा बाप म्हणून दहशत असलेल्या दाऊद इब्राहिमच्या टोळीचा विस्तार मुंबईहून नवी मुंबई आणि ठाणे परिसरात झाला.दाऊदने भारतातून काढता पाय घेतल्यानंतर गुन्हेगारी साम्राज्याचा वारसा त्याची बहिण हसिना पारकर आणि नंतर भाऊ इक्बाल कासकरकडे आला. इक्बालच्या हस्तकांनी खंडणीचे गेम ठाण्यातही वाजवले. बंदुकीच्या धाकावर शहरातील व्यापाºयांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करण्यास या टोळीने सुरूवात केली. चार वर्षांपूर्वी या टोळीने ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून सुमारे सव्वा कोटीची खंडणी उकळल्याचे प्रकरण समोर आले आणि पोलिसांनी इक्बाल कासकरच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली. इक्बालच्या तीन साथीदारांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली. छोटा शकीललाही आरोपी केले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांच्या बेड्या कुणा-कुणाच्या हाताला पडतात, हे भविष्यात समजेल. मात्र पोलिसांनी थेट दाऊदच्या टोळीलाच हात घातल्याने ठाण्यातील अन्य खंडणी बहाद्दर निमुटपणे आपापल्या बिळात जाऊन बसले आहेत.दाऊद टोळीच्या खंडणीखोरीला ठाण्यातील काही नगरसेवक व नेत्यांचे सहकार्य लाभल्याची बाब सर्वाधिक गंभीर आहे. पोलिसांनी या दिशेने लवकरात लवकर तपास करुन यावरील पडदा उठवावा. कारण ठाण्यातील मतदारांनी लोकप्रतिनिधी या नात्याने जर चुकीच्या मंडळींना निवडून दिले असेल तर ती चूक सुधारण्याची संधी त्यांना मिळेल. मात्र सुरज परमार आत्महत्या प्रकरणात काही नावांबाबत विनाकारण संशय निर्माण करुन नंतर सारवासारव केली गेली तसे वर्तन पोलिसांनी करु नये. त्यामुळे पोलिसांचीच प्रतिमा मलीन होते.नियुक्ती, कारवाई, झळाळीही पूर्वनियोजित?इक्बाल कासकरच्या मुसक्या आवळून नावलौकिक मिळविणाºया प्रदीप शर्मा यांचा ठाणे पोलीस दलातील प्रवेश सुनियोजित होता. कधीकाळी मुंबई पोलीस दलाचे नाव गाजवणाºया या अधिकाºयाने आता ठाणे पोलीस दलाला झळाळी मिळवून दिली आहे.शर्मा यांनी मुंबईमध्ये अनेक गुन्हेगारांचा खात्मा केला. शंभरावर गुन्हेगारांना चकमकीत संपवणाºया या अधिकाºयावर एका बनावट चकमकीच्या आरोपाखाली कारवाई झाली. त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचीही चौकशी झाली. शर्मा यांच्यावर दाऊदशी निकटचे संबंध असल्याचे आरोप झाले होते. सर्व आरोपांमधून दोषमुक्त झाल्यानंतर महिनाभरापूर्वी ते मुंबई पोलीस दलात पुन्हा रूजू झाले. पोलीस नियंत्रण कक्षात त्यांची नियुक्ती झाली, त्याचवेळी ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. टी. कदम यांना सहायक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नतीनंतर खंडणी विरोधी पथकातील एक अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदासाठी पात्र होता. मात्र शर्मांसाठी या अधिकाºयाला बाजूला ठेऊन, काही दिवस हे पद रिक्त ठेवण्यात आले.शर्मा यांनी खंडणी विरोधी पथकाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर महिना पूर्ण व्हायच्या आतच त्यांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला बेड्या ठोकल्या. गुन्हेगारी जगतामध्ये या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली. सामान्य ठाणेकरांना ही कारवाई एकाएकी झाल्यासारखे वाटत असले तरी प्रदीप शर्मांनी त्याची पूर्वतयारी आधीपासूनच केली होती, असे दिसत आहे. खंडणीच्या ज्या प्रकरणामध्ये इक्बालला बेड्या ठोकल्या, ते प्रकरण तब्बल ५ वर्षांपूर्वीचे आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक तक्रारीसाठी रातोरात तयार झाला नाही. इक्बालच्या ठावठिकाण्याची माहितीही खंडणी विरोधी पथकाला वेळेवर मिळाली, असे नाही. काही अधिकाºयांच्या मते हा संपूर्ण घटनाक्रम सुनियोजित होता. इक्बाल कासकरच्या अटकेमुळे शर्मा यांना त्यांच्यावरील दाऊदशी निकटचे संबंध असल्याचे आरोप खोडून काढण्याची संधी मिळाली आहे.दाऊद इब्राहिम आजारी असून स्वत:हून भारतात येण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. मात्र त्याला आणल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. राज ठाकरेंनी केलेल्या या गंभीर आरोपात किती तथ्य आहे ते ठाऊक नाही. मात्र, शर्मांनी इक्बालला केलेली अटक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेले स्थान व सत्यपाल यांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकाºयांना कासकरच्या अटकेचे मिळालेले श्रेय ही त्रिसूत्री निव्वळ योगायोग नक्कीच नसेल, असे राजकीय जाणकारांना वाटते. जी खरेच जुळवाजुळव असले तर लवकरच त्याचा तपशील, त्यातील लागेबांधेही बाहेर येतील.
डॉन को पकडना... मुमकीन है?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:21 AM