डोंबिवली : एकीकडे वाढणारी काँक्रिटीकरणाची जंगले, रस्त्यांचेही सिमेंटीकरण, पदपथांपासून इमारतींच्या आवारापर्यंत आणि उद्यानांपासून मैदानांपर्यंत सर्वत्र वाढलेला पेव्हरब्लॉकचा वापर यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रियाच शहरात होत नाही. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ती वाढवण्यासाठी भारत विकास परिषदेने डोंबिवलीत १२५ शोषखड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यातून ५० हजार लीटर पाणी जमिनीत मुरवण्याचा परिषदेचा संकल्प आहे. भूजलस्तर वाढवण्यासाठी शोषखड्डे खोदण्याच्या उपक्रमाला सोमवारपासून सुरुवात झाली. डोंबिवलीतील नेहरू मैदान, शाळांची मैदाने यांची निवड त्यासाठी भारत विकास परिषदेने केली आहे. आतापर्यंत १७ शाळांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय, शहरातील मोकळ्या जागेतही शोषखड्डे खोदले जातील. त्यामुळे या उपक्रमास सोसायट्यांनीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन परिषदेने केले आहे. पाच फूट खोल, तेवढेच लांब-रुंद खड्डे खोदले जातील. त्यात विटा, रेती, दगडाचे बारीक तुकडे टाकले जातील. त्यानंतर तो खड्डा हलकेच बुजवला जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आपोआप गाळले जाऊन जमिनीत मुरेल, अशी ही व्यवस्था आहे. एका शोषखड्ड्याला पाच हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे एकूण उपक्रमाला जवळपास सात ते आठ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील एक लाख २५ हजारांचा निधी लोकवर्गणीतून परिषदेने जमा केला आहे. उरलेला निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. भारत विकास परिषदेच्या देशभरात १२०० शाखा आहेत. सेवा, संपर्क, संयोग आणि समर्पणाची पंचसूत्री घेऊन गेली ५३ वर्षे परिषदेचे कार्य सुरू आहे. भारत खोज अभियान, पर्यावरण जनजागृती परिषदेमार्फत पार पाडले जाते. डोंबिवलीतही परिषदेची शाखा १७ वर्षे कार्यरत आहे. आमदार रवींद्र चव्हाण, राहुल दामले, परिषदेचे सरचिटणीस विनोद करंदीकर, कोषाध्यक्ष जयंत फाळके, शरद मांडिवले, दीपाली काळे, प्रवीण दुधे आदी पदाधिकारी भूजलस्तर वाढवण्याच्या शुभारंभास हजर होते. अक्षयतृतीयेच्या संकल्पाचा कधीही क्षय होत नाही, या भावनेतून हा दिवस निवडण्यात आला.
डोंबिवलीतही ‘पाणी मुरवा, पाणी पुरवा’
By admin | Updated: May 12, 2016 02:10 IST