डोंबिवली : पूर्वेतील इंदिरा गांधी चौक व बाजीप्रभू चौकातील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात बुधवारी वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाईचा बडगा उगारला. त्यास विरोध म्हणून काही रिक्षाचालकांनी तातडीने बंद पुकारत या कारवाईचा निषेध केला.इंदिरा गांधी व बाजीप्रभू चौकात चालक मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. त्याबाबत, वाहतूक विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याआधारे पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी कारवाई केली. त्यामुळे चालकांनी बंद पुकारला. रिक्षाचालकांनी शिस्तीचे पालन करावेच लागेल, असा पवित्रा गंभीरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी मध्यस्थी केली. नागरिकांना वेठीस धरू नका. मागण्या, तक्रारींसंदर्भात बैठकीत चर्चा करावी, वाहतूक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे रिक्षाचालकांनी २० मिनिटांत बंद मागे घेतला. यासंदर्भात लकरच बैठक घेतली जाईल, अशी माहिती गंभीरे यांनी दिली.भाजपाप्रणीत युनियनचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी सांगितले की, आरटीओ या गोंधळाला कारणीभूत आहे. शहरात नेमके अधिकृत रिक्षा स्टॅण्ड किती आहेत, याची माहिती का दिली जात नाही. रिक्षांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेत आता नवे स्टॅण्ड मंजूर करावेत. तसेच कोंडी होणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, ही सर्वच युनियन पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. २००७ पासून स्टॅण्डसंदर्भातील मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर, आरटीओ अधिकारी का कार्यवाही करत नाहीत, असा सवाल माळेकर यांनी केला. त्यासाठी किती बैठका घ्यायच्या, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकांवर डोंबिवलीत कारवाई
By admin | Updated: January 26, 2017 03:02 IST